हायअलर्ट ! नागरिकांनो आजुबाजुला काय घडतंय यावर लक्ष ठेवा
नागरिकांनो तुमच्या आजुबाजुला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर नजर असू द्या.
मुंबई : तुम्ही प्रवासात असाल, एखाद्या मॉलमध्ये गेला असाल, कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी गेला असाल, तर आजूबाजूला काय घडतंय, याकडे जरा डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवा. सावध राहा, सतर्क राहा. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका पाहता दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सतर्क राहण्याची गरज आहे.
पुलवामा हल्ला, दहिसरमधला स्फोट, रायगडमध्ये एसटीमध्ये बॉम्ब या घटना उघडकीस आल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणांना डोळ्यांत तेल घालून पाहारा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईतली रेल्वे सेवा, रेल्वे स्थानकं, मेट्रो रेल्वे, मुंबईतली गर्दीची ठिकाणं, समुद्रकिनारे हे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. याआधीही मुंबईतल्या लोकलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. दहिसर चेकनाक्यासमोर मॉलमध्ये झालेला छोटा स्फोट आणि रायगडमध्ये एसटीबसमध्ये सापडलेला बॉम्ब यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा धोका सुरक्षा दलांनी अधोरेखीत केला आहे. लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी या दोन्ही घटना घडल्याचा पोलिसांचा दावा आहे. सगळ्याच ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
बेवारस वस्तू किंवा संशयित बॅग दिसल्यास त्याची माहिती लगेचच पोलिसांना द्या. अफवा पसरवू नका. लोकलमधून प्रवास करत असताना सीट खाली, बेवारस बॅग याकडे लक्ष असू द्या. संशयित व्यक्ती दिसल्याच त्याची माहिती देखील लगेच पोलिसांना द्या. सूत्रांच्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत शिरण्याचा प्रयत्न करु शकतात. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.