मुंबई : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालय आज ऐतिहासिक निकाल देणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबईतही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नजर आहे. संशयितांची कसून चौकशी करण्यात येते आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येते आहे. रेल्वे स्थानकांवर देखील पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. मुंबईतील अतिसंवेदनशील ठिकाणी अधिक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे कळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निकालाच्या दृष्टीने शांततेचं आवाहन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा. राज्यात शांतता आणि सलोखा कायम राखण्यात मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.



केंद्रीय गृह मंत्रालयाने आधीच राज्य सरकारला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले होते. सर्व राज्यांना याबाबत एक पत्र पाठवण्यात आलं होतं. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे.


अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. संशयितांवर कारवाई केली जात आहे. पोलिसांच्या सायबर सेलनेही फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये निकालापूर्वी तसंच निकालानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केली जाणारी प्रक्षोभक भाषणं, माहिती आणि व्हीडिओंवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे.