मुंबई : देशात निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत असताना होळीनंतर मुंबई आणि नवी मुंबईत तापमानाचा पाराही वाढू लागलाय. रविवारी ३७ अंश सेल्सिअसपर्यंत असणारं तापमान सोमवारी दुपारी ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं. हे तापमान वर्षातील सर्वाधिक तापमान असल्याची नोंद करण्यात आलीय. पुढील तीन दिवस तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. तिकडे नवी मुंबईतही ३८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावरील वर्दळ कमी झालीय. नागरिक गारेगार उसाचा रस, कोकम सरबत आणि ताकाने आपली तहान भागवताना दिसत आहेत. उन्हाचा तडाखा पाहून दुपारच्या वेळात घरातून बाहेर पडणे टाळत आहेत.


उन्हापासून संरक्षण करण्यासाठी... 


- घराबाहेर पडताना शक्यतो उपाशीपोटी घराबाहेर पडू नका. कारण उन्हामुळे त्रास होण्याची शक्यता असते


- घराबाहेर जाताना पाण्याची बाटली सतत जवळ ठेवा. कारण उन्हामुळे शरीरातील पाण्याची मात्र कमी होते. त्यामुळे सतत पाणी पित राहा


- उन्हात बाहेर गरम हवा वहात असते. त्यापासून शरीराचं रक्षण करण्यासाठी चेहरा सुती कपड्याने झाका


- घराबाहेरुन उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी घेऊ नका. कारण त्याचा शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते


- घराबाहेर गेल्यानंतर उघड्यावर विकले जाणारे पदार्थ खाऊ नका


- एसीतून थेट उन्हात जाऊ नका किंवा एसीतून बाहेर पडल्यानंतर थोडा वेळ सामान्य वातावरणात काही वेळ घालवल्यानंतर घराबाहेर पडा


- उन्हाळ्यात शक्यतो सुती कपड्यांचा वापर करा. त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते


- बाहेर जातांना गॉगल, टोपी आणि रुमाल वापरा. कारण त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळांपासून डोळ्यांचं संरक्षण होते


- उन्हाळ्यात भरपेट जेवण करु नका. भूकेपेक्षा थोडं कमी जेवण करा 


- उन्हाळ्यात तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाऊ नका. त्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो


- उन्हाळ्यात शक्यतो शिळे अन्न खाऊ नका. घरातील उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवा


- दररोज आहारात दही आणि ताकाचा समावेश असावा तसेच लिंबू पाणी आणि नारळ पाणी घ्या. ते उन्हाळ्यात शरिरासाठी फायदेशीर आहे


- टरबूज, खरबूज आणि काकडी ही उन्हाळ्यात मिळणारी फळे घ्या. ही काळजी घेतल्यास त्याचा फायदा होईल