मुंबई : शनिवारी कोकण, मुंबई आणि उपनगारांसह ठाणे तसंच पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं. रात्रभर मुंबई आणि उपनगारांसह ठाणे, कल्याण डोंबिवलीत पावसाची संततधार सुरुच होती.. काल झालेल्या पावसाने मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल सेवा ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणीही साचलं होतं. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता उद्या पालघर, ठाणे, रायगड, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शाळा आणि काँलेजना सुटी जाहीर करण्यात आली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा येण्याची सवलत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांनी 5 ऑगस्ट रोजी आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील राज्य शासनाकडून  करण्यात आले आहे. 



आजही मुंबईसह उपनगरं आणि ठाणे, पालघर तसंच कोकण किनारपट्टीत पावसाचा जोर कायम राहाणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी गरज असेल तरच घराबाहेर पडावे तसेच समुद्राजवळ जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान रेल्वेने प्रवाशांच्या सोईसाठी आजचा मेगाब्लॉक रद्द केला आहे.