दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ४ दिवसामध्येच रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेला हा निर्णय म्हणजे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांना धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा निर्णय रद्द केल्यामुळे सरकारमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव पुन्हा समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वादावर खुलासा केला आहे. 'मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी ज्या अंतर्गत बदल्या केल्या, त्या माझ्या कार्यालयाने आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने रद्द केल्या आहेत. आमच्या सरकारमध्ये चांगला समन्वय आहे आणि कोणताही मतभेद नाही,' असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. 



गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या या खुलाशानंतर तर आणखी प्रश्न उपस्थित होत आहेत. गृहमंत्री जर मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी या बदल्या केल्याचं म्हणत असतील तर पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना न विचारताच या बदल्या केल्या का? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना त्याला गृहमंत्र्यांची परवानगी लागते. पोलिसांच्या बदल्यांचे आदेशाचं परिपत्रक बघितलं तर ते मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाने नाही, तर गृहविभागाने म्हणजेच अनिल देशमुखांच्या खात्याने काढलं आहे. मग गृहमंत्री या बदल्या मुंबई पोलीस आयुक्तांनी केल्या आहेत, हे कोणत्या आधारावर म्हणतात? तसंच पोलीस आयुक्तांना अशा बदल्यांचे अधिकार नाहीत. 


गृहविभागाचं परिपत्रक




गृहखात्यातल्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माहिती न देताच, बदल्यांचा निर्णय घेतला का? हा प्रश्नही उपस्थित होतोय. अधिकारी हे मंत्र्यांना विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याची तक्रार याआधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी वारंवार केली आहे. याच मुद्द्यावरून महाविकासआघाडीमध्ये नाराजीही आहे. शरद पवार यांनी याबाबतच काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीच्या २४ तासांच्या आतच पुन्हा एकदा हा नवा गोंधळ समोर आला आहे. 


मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला दणका, गृहमंत्र्यांनी केलेल्या पोलिसांच्या बदल्या ४ दिवसातच रद्द