अमोल पेडणेकेर, झी मीडिया, मुंबई : मुंबईमध्ये फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली असून त्याच्या पुढे आता पालिका आणि पोलीस प्रशासनदेखील हतबल झाल्यासारखे दिसत आहेत. घाटकोपर रेल्वे स्थानकालगत फेरीवाल्यांची तक्रार केली म्हणून एक हॉटेल चालकाला धमकावून हॉटेलची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तोडफोडीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. तर या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाटकोपर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले असून दिवसेंदिवस त्यांची दादागिरी वाढत आहे. स्टेशन परिसरातील अग्रवाल हॉटेल समोर मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसतात. त्यामुळे ग्राहकांना, पादचाऱ्यांना इथून चालणे मुश्किल होत आहे. या बाबत हॉटेलचे मालक बिपीन अग्रवाल यांनी पालिकेत तक्रार केली होती. अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर पालिकेचे अधिकारी आणि पोलीस तिथे दाखल झाले. मात्र या वेळी फेरीवाल्यांनी या अधिकाऱ्यांच्याच समोरच हॉटेल चालकावर हल्ला केला. अग्रवाल यांच्या हॉटेलमधील साहित्य रस्त्यावर फेकले.


या प्रकरणी अखेर बिपीन अग्रवाल यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल केला. मात्र याबाबत पालिका आणि पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची आणि घाटकोपर रेल्वे स्थानकाला जोडणारे सर्व रस्ते फेरीवाला मुक्त करण्याची मागणी हॉटेलच्या मालकाने केली आहे.


आम्हाला पोलीस संरक्षण द्या; हॉटेल चालकाची मागणी


"आम्ही फेरीवाल्याविरोधात मोहिम सुरु केली आहे. रोडवर बसणारे फेरीवाले बंद व्हावेत यासाठी आम्ही मोहिम सुरु केली आहे. आम्ही यासंदर्भात महापालिकेला देखील तक्रार केली आहे. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येवून बाहेर बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. त्यानंतर फेरीवाल्यांनी आम्हाला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दुकानात घुसून तोडफोड केली. त्यानंतर मला जीवे मारण्याची धमकी दिली. माझी प्रशासनाला विनंती आहे की, फेरीवाल्यांवर कारवाई करावी आणि आम्हाला पोलीस संरक्षण द्यावं. फेरीवाले दादागिरी करुन असून इथून हटणार नाही असे सांगत आहेत. चार जण यांच्याकडून पैसे घेऊन फेरीवाल्यांना रस्त्यावर बसू देतात. हे सगळं बंद व्हायला हवं," असे बिपीन अग्रवाल यांनी म्हटलं.