सीएएचा धसका, नवी मुंबई, ठाण्यातून मोलकरणी गायब
सीएए कायदा आल्यानं आता बांगलादेशी महिलांची पळापळ
स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : सीएएवरुन देशभरात रण माजलेलं असताना नवी मुंबई आणि ठाण्यात काम करणाऱ्या मोलकरणी अचानक गायब होऊ लागल्यात. मोलकरणी अचानक काम सोडून का निघून गेल्या याचं कोडं नवी मुंबईतल्या नागरिकांना पडलं आहे. नवी मुंबई आणि ठाण्यात घरकाम करणाऱ्या मोलकरणींमध्ये सर्वाधिक टक्का हा पश्चिम बंगाल भागातून आलेल्या महिलांचा आहे. पश्चिम बंगालमधील राहणारे असल्याचं सांगून अनेक बांगलादेशी महिलांनीही नवी मुंबई आणि ठाणे परिसरात आपलं बस्तान बसवलं आहे.
पश्चिम बंगाल आणि बांगलादेशी महिलांचं राहणीमान एकसारखं असल्यानं अनेक बांगलादेशी घुसखोरांचं फावलं आहे. नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सहज घरकाम मिळतं. शिवाय त्यातून व्यवस्थित कमाई होत असल्यानं बांगलादेशी महिला कुटुंब कबिल्यासह बेकायदा राहत आहेत. पण सीएए कायदा आल्यानं आता या महिलांची पळापळ झाली आहे.
अनेक ठिकाणी महिला घरकाम अचानक सोडून निघून गेल्याचं सांगण्यात येतं आहे. बांगलादेशी महिलांमुळे पश्चिम बंगालच्या महिलांचीही अडचण झाली आहे. अनेकांकडे भारतीय असल्याचे पुरावे नाहीत.
भारतीय नागरिक असतानाही निव्वळ बांगलादेशी महिलांशी साम्य असल्यानं अनेक महिलांना नवी मुंबईतून हुसकावून लावले जाण्याची भीती आहे. घरकाम करणाऱ्या ज्या महिला भारतातील आहेत, त्यांना आता कागदपत्रांची आठवण झालीय. रहिवासी प्रमाणपत्रं आणि दाखले आणण्यासाठी काही महिला पश्चिम बंगालमध्ये गेल्याचं घरकामगार महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
सरकारी दावे काहीही असले तरी जाणकरांच्या मते नवी मुंबई आणि ठाण्यात बांगलादेशी महिलांचा टक्का मोठा आहे. या बांगलादेशी महिला परत मायदेशी गेल्यास या भागात घरकाम करणाऱ्या महिलांची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.