मुंबई : कोरोना व्हायरसचं सावट अद्यापही मुंबईकरांच्या डोक्यावर असताना वांद्रे स्थानकाबाहेर दुपारी ४ वाजल्यानंतर हजारो कामगारांनी गर्दी केली. यामध्ये प्रामुख्याने परराज्यातील कामगार होते. १५ एप्रिलला लॉकडाऊन शिथिल होईल आणि रात्री १२ नंतर आपल्याला आपल्या राज्यात परतता येईल अशी आशा या कामगारांच्या मनात होती. एकंदर पाहता वांद्रे परिसरात अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. हे सर्व कामगार या कंपन्यांमध्ये रोजंदारीवर काम करतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्या राहण्याचे आणि खाण्याचे अत्यंत हाल होत आहेत. यातील काही कामगार काम करत असलेल्या ठिकाणीच राहत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय, एकाच घरात १३ ते १४ लोक राहत असल्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचा बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. अशात कोरोना या धोकादायक विषाणूचा याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे हातावर बोट असलेल्या या कामगारांनी आपल्या राज्यात जाण्याचा पर्याय निवडला आहे. 


दरम्यान आज लॉकडाऊन संपेल आणि किमान लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू होतील आणि आपल्याला गावी परतता येईल अशी आशा प्रत्येक कामगाराच्या मनात होती. पण अचानक लॉकडाऊन वाढल्यामुळे अनेकांची निराशा झाली.  लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक सेवा बंद आहे, शिवाय राज्यांच्या सीमा देखील सील करण्यात आल्या आहेत. अशा सर्व परिस्थितीत कामगारांची अचानक जमलेली गर्दी प्रश्न निर्माण करत आहे.


देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित करत लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला. त्याचे तिव्र पडसाद वांद्रे स्थानकाबाहेर पडसाद उमटताना दिसले. पण स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांना जमलेली गर्दी पांगवण्यात यश आलं आहे.