Ghatkopar Billboard Collapse: घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला असून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मुख्य आरोपी भावेश भिंडेला (Bhavesh Bhinde) अखेर अटक केली आहे. भावेश भिंडे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (Ego Media Pvt Ltd) कंपनीचा मालक असून, त्याच्याच कंपनीने हे होर्डिंग लावलं होतं. दुर्घटनेनंतर फरार असणाऱ्या भावेश भिंडेला अखेर 3 दिवसांनी अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या उदयपूरमधून गुरुवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांच कसून त्याचा शोध घेत होती. अखेर क्राईम ब्रांचला यश मिळालं असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

13 मे रोजी संध्याकाळी घाटकोपरमध्ये 120 फुटांचं होडिंग पेट्रोल पंपावर कोसळलं. सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेकांना पेट्रोल पंपाच्या खाली आश्रय घेतला होता. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून, 75 जण जखमी झाले आहेत. दुर्घटना घडताच भावेश भिंडे आपल्या कार चालकासह फरार झाला होता. 


भावेश भिंडेचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची 8 पथकं वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आली होती. अखेर राजस्थानच्या उदयपूरमध्ये तो सापडला असून, पोलिसांनी अटक केली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्याला गेल्यानंतर भावेश भिंडे दुसऱ्या दिवशी मुंबईत परतला होता. तेथून तो ठाण्याला आणि नंतर अहमदाबादला गेला होता. भावेश भिंडेने सतत आपली ठिकाणं बदलली. उदयपूरला पोहोचल्यानंतर त्याने आपली ओळख लपवली होती. आपलं खोटं नाव सांगत तो एका हॉटेलात लपला होता. मुंबईचे सह पोलीस आयुक्त लखमी गौतम, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर आणि गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांच्या पथकांनी त्याचा माग काढला आणि ताब्यात घेतलं.


राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (NDRF) अधिकाऱ्याने दुर्घटनेच्या ठिकाणी शोध आणि बचावकार्य गुरुवारी सकाळी 10 वाजता संपल्याची माहिती दिली आहे. रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) ताब्यात असलेल्या जमिनीवर हे बेकायदेशीर फलक लावण्यात आले होते.


कोण आहे भावेश भिंडे?


आरोपी भावेश भिंडेंने 2009 मध्ये मुलुंडमधून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्याच्या इगो नावाच्या कंपनीच्या माध्यमातून मोठ मोठे होर्डिंग्ज लावले जातात. याच भावेशवर विनापरवानगी साइन बोर्ड लावल्याचे 26 गुन्हे दाखल आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातच तसा उल्लेख आहे. भावेश भिंडेवर एवढे गुन्हे असतानाही रेल्वे पोलिसांनी त्याला होर्डिंग्ज लावण्याची परवानगी कशी दिली? असा प्रश्न निर्माण होत आहे. घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग हे मुंबईतलचं नाही तर आशियातलं सर्वात मोठं होर्डिंग असल्याची जाहीरातबाजी भावेश भिंडेंच्याच कंपनीने केली होती. 


मुंबईत महापालिकेच्या नियमानुसार 40 बाय 40 फूट होर्डिंग लावण्याची परवानगी आहे. या होर्डिंगची उंची 120 बाय 120 फूट असल्याचं समोर आलंय. तेव्हा या होर्डिंगला परवानगी दिली नसल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केला. मुंबईत जाहिरातीचे होर्डिंग्ज लावण्यासाठी मुंबई महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मुंबईत महापालिकेने एकूण 1025 होर्डिंग्स बॅनर लावण्याची परवानगी दिलेली आहे. यात 179 होर्डिंग्स रेल्वेच्या हद्दीत आहेत.. ज्याची मुंबई महापालिकेने परवानगी दिलेली नव्हती,


भावेश भिंडेवर आधीच 26 गुन्हे दाखल होते. तरीही उजळ माथ्याने तो व्यवहार कसे करत होता.. रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर होर्डिंगबाबत वारंवार आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केलं. ताबडतोब कारवाई का केली नाही असे अनेक सवाल या दुर्घटनेच्या निमित्ताने उपस्थित होतायत.