मुंबईत रेल्वे रुळाला खेटूनचं झोपड्या, अमृतसर दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती
मंडपाला घासून जाणारी ही लोकल पाहिली तर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : रावणदहन पाहण्यासाठी अमृतसर मध्ये रुळालगत जमलेल्या 61 जणांवर शुक्रवारी काळाने घाला घातला. रावण दहन पाहण्यात गुंग झालेले लोक आणि त्यात फटाक्यांचा आवाज यामुळे लोकांना रेल्वेचा आवाज आला नाही आणि ही दुर्दैवी घटना घडली. अमृतसर मधली ही घटना मुंबईत ही घडू शकते का याचा आढावा झी 24 तासंने घेतलायं.
रुळाला खेटूनच झोपड्या
हार्बर रेल्वे मार्गावरच्या वडाळा आणि गुरु तेगबहादूर स्थानका दरम्यान रेल्वे रुळालगतचं महात्मा गांधी नगर आहे. इथे रेल्वे पूल आणि रेल्वे रुळाला अगदी खेटूनच झोपड्या आहेत. इथल्या रहिवाश्यांचे सण, उत्सव आणि अगदी लग्न समारंभही या रेल्वे रुळालगत असलेल्या जागेतच होतात.
नवरात्रीसाठी इथे उभारला जाणारा मंडप त्याचीच साक्ष देतो. मंडपाला घासून जाणारी ही लोकल पाहिली तर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
हार्बरसह मुंबईतल्या इतरही रेल्वे मार्गावर इतरही ठिकाणी हेच चित्र पाहायला मिळतं. त्यामुळे अमृतसरमधल्या दुर्घटनेतून धडा घेत, रेल्वे प्रशासनानं रेल्वेच्या सीमा बंदिस्त करण्याची मागणी होत आहे.
दुर्घटनेची पुनरावृत्ती ?
मुंबईत लोकल रुळाशेजारी नैसर्गिक विधी उरकण्यासापासून थेट झोपडी उभारण्यापर्यंत, रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण वाढतच चाललंय.
हे वाढतं अतिक्रमण रोखण्यात रेल्वे प्रशासन सपशेल अपयशी ठरलंय.
त्यामुळे रेल्वे रुळा शेजारीच सण, उत्सव साजरे होत असतील, तर मुंबईतही अमृतसरसारख्या दुर्घटनेची पुनुरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासाठी रेल्वेनं वेळीच खंबीर पावलं उचलणं गरजेचं आहे.