शरद पवारांचे `ते` वक्तव्य ऐकून मी निराश झालो- फडणवीस
कोरोनावरील चर्चेचा रोख भरकटवण्यासाठी शरद पवार वेगळा नॅरेटिव्ह सेट करत आहेत.
मुंबई: कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या राज्य सरकारच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकासआघाडीचे नेते दररोच वेगवेगळे मुद्दे उकरून केंद्रावर टीका करत आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी या नेत्यांकडून हे 'कव्हरिंग फायर' सुरु आहे, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते शुक्रवारी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी त्यांच्यासंदर्भात केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शरद पवार यांनी नुकत्याच एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस हे सत्ता मिळवण्यासाठी उतावळे झाल्याचे म्हटले होते. याविषयी विचारणा केली असता फडणवीस यांनी म्हटले की, शरद पवारांचे हे वक्तव्य ऐकून मी निराश झालो. शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या नेत्याकडून ही अपेक्षा नव्हती. शरद पवार यांना सद्यपरिस्थितीचे पुरेपूर आकलन आहे. मात्र, केवळ राज्य सरकारला वाचवण्यासाठी ते वेगवेगळे आरोप करून कोरोनावरील चर्चेचा रोख भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोरोनासंदर्भातील राज्य सरकारच्या कामगिरीविषयी प्रश्न उपस्थित होण्याऐवजी राजकीय मुद्द्यांभोवतीच चर्चा केंद्रित राहते, असा आरोप फडणवीस यांनी केला.
छोटी राज्यही तुमच्यासारखी जीएसटीसाठी रडत बसलेली नाहीत; फडणवीसांचा राज्य सरकारला टोला
केंद्र सरकारने राज्याला एकही व्हेंटिलेटर आणि पीपीई किट दिले नाही, असा आरोप बुधवारी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी केला होता. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचला तरी फारतर जास्तीच्या ११०० व्हेंटिलेटर्सची गरज पडले. मग राज्य सरकार केंद्राकडे ४००० व्हेंटिलेटर्स का मागत आहे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच पीपीई किटसंदर्भातील महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोपही खोटा आहे. राज्याला केंद्राकडून एकही पीपीई किट न मिळाल्याचे सांगतात. मात्र, केंद्राच्या डायनॅमिक बोर्डवर महाराष्ट्रासाठी १० लाख पीपीई किट देण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच केंद्राने राज्यांना व्हेंटिलेटर्स आणि पीपीई किट पुरवणे बंधनकारक नाही. मात्र, तरीही केंद्राने ही जबाबदारी उचलली आहे. यासाठी केंद्राने महाराष्ट्राला ४६८ कोटी रुपयांचा वेगळा निधीही दिला आहे. तरीही राज्य सरकार केंद्रावर आरोप करून जनतेची दिशाभूल करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.