मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाराजीनाट्य लवकरच नवे वळण घेण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी खडसे यांच्यासोबत पक्षातील लोकांनीच दगाफटका केल्यामुळे एकनाथ खडसे प्रचंड नाराज आहे. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे मांडायला सुरुवात केल्यानंतर दिल्लीतील नेतृत्वाने सोमवारी खडसे यांना बोलावून घेतले होते. मात्र, त्यांच्यासमोर मन मोकळे केल्यानंतरही एकनाथ खडसे यांची नाराजी अद्याप दूर झालेली नाही. कालच (सोमवारी) त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर ते आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाराज खडसेंच्या भेटीगाठी वाढल्या, पवारांनंतर आता उद्धव ठाकरेंना भेटणार


या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. खडसे यांनी सोमवारी रात्री उशिरा प्रसारमाध्यमांशी पुन्हा संवाद साधला. मी आजतरी भाजपमध्येच आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. माझ्या मतदारसंघातील काही प्रकल्पांची चर्चा करण्यासाठी मी पवारांना भेटलो होतो. आज मी उद्धव ठाकरे यांनाही भेटेन. परंतु, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी आज भारतीय जनता पार्टीत आहे, असे खडसे यांनी सांगितले. त्यामुळे खडसे यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 



तत्पूर्वी सोमवारी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि भाजप महामंत्री बी एल संतोष यांची भेट घेतली. परंतु, या भेटीनंतर खडसे लगेचच शरद पवार यांच्या भेटीला रवाना झाल्याने भाजपच्या गोटातील अस्वस्थता वाढली होती. त्यामुळे भाजपने वेगाने हालचाली करत खडसे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे समजते.