मुंबई  : डॅशिंग आणि फायरब्रँड आयएएस अधिकारी (Ias Officer) तुकाराम मुंढेंची (Tukaram Mundhe) पुन्हा बदली झालीय. मुंढेंची 16 वर्षातली ही 19 वी बदली आहे. पण तुकाराम मुंढे एका ठिकाणी का टिकत नाहीत? त्यांची वारंवार बदली का होते? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. (ias officer tukaram mundhe appointed as chief executive officer of shirdi devasthan marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी प्रसिध्द असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा बदली झालीय. तुकाराम मुंढे यांची 16 वर्षाच्या सेवेत तब्बल 19 वेळा बदली झालीय. आता तुकाराम मुंढे यांची शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलीय. आरोग्य खात्यातील आयुक्तपदावरून केवळ दोन महिन्यांत मुंढेंची बदली करण्यात आली. आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी मुंढेंची पोस्टिंग झाली, त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली. 


मुंढेच्या कार्यशैलीमुळे ते नागरिकांमध्ये लोकप्रिय झाले. नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न ऑन द स्पॉट सोडवण्यासाठी ते सरकारी कर्मचा-यांना फैलावर घ्यायला कमी जास्त करत नाहीत. त्यामुळे मुंढे ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणच्या नागरिकांत त्यांच्या कामाबद्दल नेहमी समाधान तर असतं. मात्र त्या खात्यातल्या कर्मचा-यांना त्यांची अडचण होते. लोकांना जरी तुकाराम मुंढेची कार्यशैली आवडत असली तरी सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी ते डोकेदुखी ठरत असल्याचं यापूर्वी अनेकदा समोर आलं. 


काही ठिकाणी तर सत्ताधारी आणि विरोधकही तुकाराम मुंढेच्या विरोधात एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे तुकाराम मुंढेंची बदली की बदला असंच चित्र वारंवार उभं राहतं. मात्र याचा त्यांच्या कार्यशैलीवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळेच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी आली की, त्यात तुकाराम मुंढे यांचे नाव आलंच समजा. एकप्रकारे बदली होण्याचा विक्रमच मुंढेंनी आपल्या नावावर केलाय.  तुकाराम मुंढे 2005 सालच्या आयएसएस बॅचचे अधिकारी आहेत. आक्रमक आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी प्रसिद्ध असणा-या तुकाराम मुंढेंची आता शिर्डीत बदली झालीय. त्यामुळे साईबाबांच्या शिर्डी संस्थानात तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज कारभार दिसणार का याची चर्चा सुरु झालीय.