मुंबई: आमचा कोणताही आमदार पक्ष सोडायचे धाडस करणार नाही, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. सध्या राज्यात सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती वाटते का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, आमदार फुटतील अशी भीती आम्हाला अजिबात वाटत नाही. कारण, राज्यातील जनमत हे भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे कोणताही आमदार फुटण्याचे धाडस करणार नाही. यानंतरही कोणी तशी हिंमत केलीच तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिघेजण मिळून त्या आमदाराचा पराभव करतील, असा सज्जड इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना आणि शरद पवारांची जवळीक वाढली; संजय राऊत म्हणाले...


मात्र, सत्तास्थापना किंवा विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवेळी काँग्रेस कोणाला पाठिंबा देणार, याबाबत रणनीती ठरली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 



तसेच परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल गंभीर फडणवीस सरकार गंभीर नसल्याची टीकाही त्यांनी केली. केवळ घोषणा करायची आणि अंमलबजावणी करायचीच नाही, हीच या सरकारची कार्यपद्धती आहे. हे सरकार काळजीवाहू आहे तर शेतकऱ्यांची काळजी का करत नाही, असा सवालही बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. 


दरम्यान, आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला जाणार असल्याच समजते. राज्यातील ओला दुष्काळासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण ही भेट घेणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, अजूनही राज्यपालांनी त्यांना भेटीची वेळ दिलेली नाही.