शिवसेना आणि शरद पवारांची जवळीक वाढली; संजय राऊत म्हणाले...

आम्ही त्यांच्याशी बोलत असू तर तो अपराध ठरतो काय? त्यांना सगळ्यांनी भेटावं.

Updated: Nov 5, 2019, 10:56 AM IST
शिवसेना आणि शरद पवारांची जवळीक वाढली; संजय राऊत म्हणाले... title=

मुंबई: राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींनी वेग पकडला असताना शिवसेना आणि शरद पवार यांच्यातील जवळीक चांगलीच वाढल्याचे दिसत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपण पुन्हा एकदा शरद पवार यांच्याशी संपर्क साधल्याची कबुली दिली. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.

काही दिवसांपूर्वीच राऊत यांनी मुंबईतील पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये भेटीगाठी झाल्या नव्हत्या. मात्र, आता राऊत यांनी अजूनही आपण फोनवरून शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. 

शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलत असू तर तो अपराध ठरतो काय? त्यांना सगळ्यांनी भेटावं. सध्या शरद पवार यांच्याशी कोण कोण बोलत आहे, या सर्वाची माहिती आपल्याकडे आहे. तसेच मी शरद पवार यांना भेटल्यानंतर ज्यांच्या पोटात पोटशूळ उठला होता तेदेखील पवारांना कसा आणि कुठे संपर्क साधू पाहत आहेत, हेदेखील मला पक्के ठाऊक असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

'दिल्लीतील प्रदूषण महाराष्ट्रात येणार नाही, महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच'

तसेच यंदाच्या सत्तास्थापनेत केवळ एकाच पक्षाची भूमिका नाही. ते चित्र आता बदलले आहे. यंदा प्रत्येक पक्षाची, एवढेच काय अपक्षही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचा प्रमुख नेता हालचाली करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

साहेब आपण करून दाखवलं; मातोश्रीबाहेर झळकले पोस्टर्स

शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत दररोज पत्रकारपरिषद घेऊन भाजपला नवनवे इशारे देत आहेत. आजच्या पत्रकारपरिषदेतही त्यांनी शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे मांडली. महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल पण मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.