कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: महापालिकेच्या रुग्णालयातील कोरोनाच्या रुग्णांकडे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. त्या सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्याय यावेळी त्यांनी म्हटले की, बाहेरच्या राज्यातील आरोग्य कर्मचारी येऊन सध्या महाराष्ट्रात सेवा देत आहेत. अशावेळी रुग्णालयातील पर्मनंट कर्मचाऱ्यांनीही कामावर यायला हवे. ते कामावर येणे टाळत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. जर एखादी कामगार संघटना अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना पाठिशी घालत असेल तर त्या युनियनवरही कारवाई करण्यास मागेपुढे पाहिले जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा महापौरांनी दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केईएम रूग्णालयाच्या कोवीड अतिदक्षता विभागातील नर्स, वॉर्डबॉय तासोनतास गायब
 
नुकताच केईएम प्रशासनातील गलथान कारभार चव्हाट्यावर आणणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता. या व्हीडिओत तहानेने व्याकूळ झालेली एक महिला रुग्ण पाण्याची रिकामी बॉटल आपटताना दिसत आहे. मात्र, त्याठिकाणी नर्स किंवा वॉर्डबॉय हजर नसल्याचे दिसत आहे. अनेक नर्स आणि वॉर्डबॉय दांड्या मारत असल्याने केईएममध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल सुरु आहेत. अगदी केईएमच्या कोवीड अतिदक्षता विभागातील नर्स आणि वॉर्डबॉय तासोनतास गायब असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. 


केईएम रुग्णालयातून कोरोनाचा पेशंट हरवला

या पार्श्वभूमीवर 'झी २४ तास'शी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की,  तुम्ही दाखवलेल्या व्हिडिओमधून ही गोष्ट नव्याने आमच्या निदर्शनास आली आहे. यापूर्वी आमच्या कानावरही अशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे मी सध्या रुग्णालयांमध्ये सरप्राईज व्हिजीट देत आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर बाहेरचे लोक सेवा देतायत आणि रूग्णालयातील पर्मनंट कर्मचारी येत नसतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. तसे निर्देश मी प्रशासनाला देणार असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच युनियन अशा गोष्टींना पाठिशी घालत असेल तर त्यांना उघडे पाडायची वेळ आहे. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असे मत किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले.