दीपक भातुसे / मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे योग्य उपचारांअभावी काही बरे वाईट झाले तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा थेट इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून त्यातून हा इशारा दिलाय.


भुजबळ निर्दोष आहेत!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोपर्यंत न्यायालय कोणत्याही निर्णयापर्यंत येत नाही, तोपर्यंत छगन भुजबळ निर्दोष आहेत. जामीन हा नियम आहे, तर तुरुंगात जाणं हा अपवाद (bail is rule & jail is exception) असे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी सांगितले आहे. हेच तत्व भुजबळांनाही लागू होते. मात्र दुर्दैवाने त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळला जातोय. याबाबत मी भाष्य करणार नाही, असेही पवार यांनी या पत्रात म्हटलेय.


आमदारांची विधिमंडळात मागणी


दरम्यान, छगन भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी मिळावी, यात राज्य सरकारने लक्ष घालावं, अशी मागणीही राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधिमंडळात केली होती.


योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार


तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांच्यावर सध्या मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र भुजबळांना जे.जे. रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाहीत, अशी तक्रार त्यांच्या समर्थक आमदारांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत केली होती. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ८ मार्च रोजी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.


पवार यांनी पत्रात काय लिहिलेय!


छगन भुजबळ यांच्या प्रकृतीबाबत शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- योग्य उपचारांअभावी भुजबळांचे. काही बरे वाईट झाले तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल
- पत्रात पवार यांनी भुजबळांच्या प्रकृतीबाबत व्यक्त केली चिंता
- भुजबळांना योग्य उपचार मिळावेत अशी माझी अपेक्षा आहे, तो त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे
- शरद पवार हे जनपाठिंबा असलेले ओबीसी नेते आहेत,त्यांनी ५० वर्षाच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची पदं भूषविली आहेत
- मुंबईचे महापौर, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पर्यटन मंत्री ही पदं त्यांनी भूषवली आहेत
- समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले काम दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही