मुंबई: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वीर सावरकर पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते मंगळवारी मुंबईत 'सावरकर- इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आम्ही गांधी आणि नेहरू यांचे कार्य नाकारत नाही. पण, या देशात काय दोनच घराणी जन्माला आली का, असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. 
 
 तसेच उद्धव ठाकरे यांनी वीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणीही केली. सावरकर यांची क्रांती रक्तरंजित किंवा आतंकवादी नव्हती, तर विधायक हिंसेची होती आणि ती झाली असती, तर इतिहास वेगळाच निर्माण झाला असता. सरदार वल्लभभाई पटेल मुख्यमंत्री असते तर काश्मीरचा प्रश्न कधीच सुटला असता. पण, सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता, असे उद्धव यांनी म्हटले. 


'राहुल गांधींच्या सावरकरांवरील ट्वीटची चौकशी करा'
 
 यावेळी उद्धव यांनी सावरकरांविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. काँग्रेसने कितीही द्वेष केला, दुर्लक्ष केले तरी स्वातंत्र्यवीर सावरकर संपणार नाहीत. सावरकरांचे कौतुक, वर्णन करण्याची काही आवश्यकता नाही. पारतंत्र्याच्या काळोखात लखाखून गेलेली ती वीज होती. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना भरचौकात जोडे मारले पाहिजेत, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.