पुणे: प्रचारासाठी मला आणखी तीन-चार आठवडे मिळाले असते तर आघाडीने १५० जागांपर्यंत मजल मारली असती आणि राज्यातील चित्र वेगळे दिसले असते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी 'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील तरूणाईकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाल्याचे सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीत आम्हाला कोणतेही आव्हानच नाही, ही मुख्यमंत्र्यांनी वापरलेली भाषा हा सत्तेचा उन्माद होता. अशी भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. एक्झिट पोलनी व्यक्त केलेल्या अंदाजाची मला चिंता नव्हती. कारण मला समोर बसलेल्या माणसाच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनात काय चाललंय, हे कळते. त्यामुळे एक्झिट पोलच्या निकालांना अर्थ नव्हता, असे पवारांनी म्हटले. 


यावेळी पवारांनी शिवसेनेच्या साथीने सरकार स्थापन करण्याची शक्यता फेटाळून लावली. शिवसेना आमच्याकडे मदत मागणार नाही. त्यामुळे आदित्यला मुख्यमंत्री करण्यासाठी आमचा पाठिंबा मागण्याचा विषय चर्चेला येणारच नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये चांगले अंडरस्टँडिंग आहे. भाजप ते मोडणारही नाही. कारण, शिवसेनेची साथ सोडणे भाजपला महागात पडेल, असेही यावेळी पवारांनी सांगितले. 



यावेळी पवारांनी आपल्या यशात काँग्रेसचेही मोठे योगदान असल्याचे सांगितले. त्यांचे राष्ट्रीय नेते प्रचारात उतरले नाही, या चर्चेला अर्थ नाही. हरियाणात आम्हीदेखील उमेदवार उभे होते. मात्र, त्याठिकाणी मी प्रचाराला गेलो नाही. कारण, त्याठिकाणी आमचा बेस नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्याबाबतीतही हीच बाब लागू पडते. त्यामुळे त्यांनी हरियाणात अधिक प्रचार केला. याचा अपेक्षित परिणाम दिसून आल्याचेही पवारांनी सांगितले.