मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती झाली नाही तर आपल्याला जिंकणे कठीण जाईल, अशी स्पष्ट कबुली भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दिली. लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने भाजपकडून मतदारसंघनिहाय बैठका सुरु आहेत. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चिंतेचा सूर व्यक्त केला. शिवसेना स्वतंत्रपणे लढली तर अनेक मतदारसंघांमध्ये मतांची विभागणी होईल. त्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो, असे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, हा संभाव्य धोका लक्षात घेऊन भाजपकडून पडद्यामागे शिवसेनेशी युती करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनही केला होता. यावेळी शहा यांनी युतीचा प्रस्ताव उद्धव यांच्यासमोर मांडला. मात्र, त्यानंतरचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे शिवसेनेनेही लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आजपासून विभागवार पदाधिका-यांच्या आढावा बैठका सुरु झाल्या आहेत. यानंतर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी शिवसेना युतीसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. लोकांच्या मनात युती व्हावी, असा विचार आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे हेच घेतील, असे केसरकर यांनी सांगितले. 


यापूर्वी खासदार संजय काकडे यांनीही भाजपला धोक्याचा इशारा दिला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती न केल्यास भाजपला मोठा फटका बसेल. ४८ पैकी ४० मतदारसंघ तर सोडाच पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना स्वत:च्या मतदारसंघातही जिंकता येणार नाही. त्यांचा दीड-दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य त्यांनी केले होते.