मुंबई: भारतीय प्रौद्योगिकी संस्थान अर्थात IIT मधून एमटेक करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांच्यादृष्टीने एक चिंतेची बातमी समोर आली आहे. IIT मधील या अभ्यासक्रमाचे शुल्क ३५ हजारावरून थेट दोन लाख इतके करण्यात आले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून (एमएचआरडी) या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आता अनेक गरजू विद्यार्थ्यांसमोर पेच उभा राहण्याची शक्यता आहे. या शुल्कवाढीला मुंबई IIT मधील विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे आता एमएचआरडी आपला निर्णय मागे घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 



आयआयटी संस्थांमध्ये एमटेक अभ्यासक्रमासाठी सध्या प्रवेश आणि शिकवणी असे प्रति सेमिस्टर पाच ते दहा हजार रुपये शुल्क आकारले जाते. देशभरातील सात IIT संस्थांमध्ये एमटेकचे साधारण १४ हजार विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना दरमहा साधारण १२ हजार ४०० रूपये मानधन दिले जाते. यासाठी बराच निधी खर्च होतो. मात्र, काही विद्यार्थी अर्ध्यावरच शिक्षण सोडून देतात. शुल्कवाढीमुळे अर्ध्यावर शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल, असा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयापुढे मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे.