मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं आणि तेव्हापासून राज्यातील जिम बंद आहेत. मात्र आता अनलॉकमध्ये राज्यातील जिम तत्काळ सुरु करण्यात याव्यात अशी मागणी करणारं पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. तसंच हळूहळू राज्यातील सर्वच क्षेत्रांचा विचार करुन अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्या-त्या क्षेत्रांसाठी मार्गदर्शक तत्त्वं तयार करुन ती क्षेत्रं खुली करायला हवीत, अशीही मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या संकटात नागरिक त्रस्त असताना, आता त्यांना आणखी आर्थिक संकटात टाकता येणार नाही. जेव्हा एखादं संकट येतं, तेव्हा केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच त्याकडे न पाहता, त्या संकटाचं सामाजिक, आर्थिक आणि मनोवैज्ञानिक परिणामही तपासले पाहिजेत, असं फडणवीसांनी म्हटलंय. आरोग्यासोबतच आर्थिक आणि सामाजिक स्वास्थही टिकून राहील, याचाही कटाक्षाने विचार केला पाहिजे. कोरोना प्रतिबंधक उपाय करत सगळं सुरु करायला हवं, त्याशिवाय पर्याय नाही असं सांगत त्यांनी लोकांच्या अर्थकारणावर अधिक काळ निर्बंध घालू शकत नसल्याचं पत्रातून म्हटलं आहे.


राज्यात दारुची दुकानं सुरु असताना, जिम बंद ठेवल्या जातात ही बाब दुर्दैवी असून कोरोना नियंत्रणाची संपूर्ण रणनीतीच चुकली आहे. सरकार पातळीवर कोणतंही नियोजन, उपाययोजना, निर्णयशीलता दिसून येत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. ज्या काळात चाचण्यांवर भर देण्याची गरज होती, त्या काळात चाचण्या केल्या नाही. नंतर चाचण्या वाढल्या, असं भासवण्याचा प्रयत्न झाल्याचं ते म्हणाले. संख्यावृद्धीसाठी अँटीजेन चाचण्यांवर भर देण्यात आल्याने आज परिस्थिती अवघड झाल्याचंही त्यांनी म्हटलंय.


सर्वच क्षेत्रात कायम आघाडीवर राहिलेल्या महाराष्ट्राने आज अनलॉकच्या बाबतीतही आघाडी घेतली पाहिजे होती, पण तसं झालं नाही. इतर राज्यांमध्ये सलून लवकर पुन्हा सुरु करण्यात आली, पण महाराष्ट्रात ती उघडण्यासाठी आंदोलनाची तयारी करावी लागली. आता जिम सुरु करण्यासाठीही अनेक लोक आंदोलनाच्या तयारीत आहेत, त्याबाबत माझ्याकडेही सातत्याने विनंती येत असून त्या मागणीला माझं समर्थन असल्याचं फडणवीस यांनी पत्रात म्हटलंय.