मुंबईत यंदा कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जनात ५७.७६ टक्के वाढ
मुंबई महापालिकेने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. शासनाच्या सूचनांचे पालन करत मुंबईकरांनी दीड दिवसाच्या बाप्पाला साधेपणाने निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यदांचा गणेशोत्सव साधेपणा जपत साजरा करावा असं आवाहन महापालिकेने केले होते.
यंदा श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन हे प्राधान्याने कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना केले होते. या आवाहनाला मुंबईकरांनी अतिशय चांगला प्रतिसाद देत दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला अतिशय साधेपणाने निरोप दिला. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत कृत्रिम तलावांमध्ये श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या टक्केवारीत यंदा तब्बल ५७.७६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्यावर्षी ३ सप्टेंबर, २०१९ रोजी कृत्रिम तलावांमध्ये १४ हजार ४९० एवढया दीड दिवसांच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यंदा या संख्यात लक्षणीय वाढ झाली असून महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये २२ हजार ८५९ एवढया श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याचबरोबर आपल्या बाप्पाला घरी किंवा सोसायटीमध्ये निरोप देणाऱया नागरिकांची ही संख्या यंदा मोठी होती.
अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा दीड दिवसांनी निरोप दिला. मुंबईत यंदा अनेक मोठ्या मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही जणांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे.