आता म्हाडाची घरं श्रीमंतांसाठी, तुम्ही भरु शकाल का अर्ज?
मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी तुम्ही अर्ज करताय, मग तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी
Mhada Lottery : मुंबईत हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी सामान्यांच्या बजेटमध्ये परवडेल अशा म्हाडाच्या घरांना लोकांची पहिली पसंती असते. पण आता म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आलीय.
गृहनिर्माण विभागानं यासंबंधीचा शासन निर्णय जारी केलाय. म्हाडा सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च असे उत्पन्न गट आहेत. या उत्पन्न गटासाठी विशिष्ट उत्पन्न मर्यादाही निश्चित करण्यात आलीय. या उत्पन्न मर्यादेनुसार इच्छुकांना सोडतीत अर्ज भरत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करता येतं.
उत्पन्न मर्यादेनुसारच अर्ज भरणं अत्यंत आवश्यक असते. आतापर्यंत अत्यल्प गटासाठी प्रति महिना 25 हजार रुपयांपर्यंत, अल्प गटासाठी प्रति महिना 25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत, मध्यम गटासाठी प्रति महिना 50 हजार ते 75 रुपये आणि उच्च गटासाठी रुपये 75 हजाराच्या पुढे अशी उत्पन्न मर्यादा होती. आता यात बदल करत ही उत्पन्न मर्यादा वाढविण्यात आलीय.
नव्या बदलानुसार आता प्रत्येक गटासाठी आता वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवण्यात त्यानुसार
अत्यल्प गट - वार्षिक 6,00,000 रुपये
अल्प गट - वार्षिक 6,00,001 ते 9,00,00 रुपये
मध्यम गट - वार्षिक 9,00,001 ते 12,00,000 रुपये
उच्च गट - वार्षिक 12,00,001 ते 18,00,000 रुपये
उर्वरित महाराष्ट्रासाठीही उत्पन्न मर्यादेत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता अत्यल्प गटासाठी वार्षिक 4,50,000 रुपये, अल्प गटासाठी वार्षिक 4,50,001 ते 7,50,000 रुपये, मध्यम गटासाठी वार्षिक 7,50,001 ते 12, 00,000 रुपये आणि उच्च गटासाठी 12, 00,001 ते 18,00,000 रुपयांपर्यंत अशी उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
घरांच्या क्षेत्रफळातही बदल
उत्पन्न गटानुसार सोडतीतील घरांच्या अनुज्ञेय क्षेत्रफळातही बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार आता अत्यल्प गटातील घरांसाठी 30 चौ.मी., अल्प गटातील घरांसाठी 60 चौ.मी.पर्यंत, मध्यम गटातील घरांसाठी 160 चौ.मी. आणि उच्च गटासाठी 200 चौ.मी. असं क्षेत्रफळ लागू असणार आहे.