राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात मोठी वाढ
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात मोठी वाढ झालीय. सीआयडीच्या वार्षिक अहवालात ही धक्कादायक आकडेवारी समोर आलीय.
मुंबई : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात मोठी वाढ झालीय. सीआयडीच्या वार्षिक अहवालात ही धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. २०१८ साली राज्यात महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे १०.९५ टक्क्यांनी वाढले. यापैकी सर्वाधिक गुन्हे मुंबई शहरात घडलेत. या गुन्ह्यांची संख्या ६ हजार ५८ इतकी आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल होण्याची टक्केवारी अमरावती शहरात सर्वाधिक आहे.
राज्यातील एकूण गुन्ह्यांच प्रमाण १९.८७ टक्क्यांनी वाढलंय. अन्य राज्यांच्या तुलनेत गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात सातवा क्रमांक लागतो, अशी माहिती सीआयडीच्या २०१८ सालच्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी गतवर्षीही महिलांवरील अत्याचारांमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानी होते. २०१८ आणि २०१९ मध्येही गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सलग तिसऱ्या वर्षीही वाढ दिसून येत आहे.
मुंबईतील गुन्हेगारी कमी झाली असली, तरी महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ दिसून येत आहे. मुंबई, दिल्ली या शहरांतही वाढ दिसत आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी पाहिली असता यात वाढच होताना दिसून येत आहे.
२०१८ आणि २०१९ चालू वर्षातही महिलांवरील अत्याचाराचा आलेख चढाच आहे. २०१७ यामध्ये महिला अत्याचाराचे पाच हजार ४५३ गुन्हे मुंबईत दाखल झाले होते. २०१८ मध्ये गुन्ह्यांची ही संख्या पाच हजार ९७८ इतकी असून २०१९ मध्ये सप्टेंबरपर्यंत चार हजार ८२२ इतके गुन्हे घडले आहेत.