मुंबईत होम क्वारंटाइन रुग्णांचा कालवधी वाढला; BMC चे परिपत्रक जारी
महापालिकेचं होम क्वारंटाइन संदर्भातील परिपत्रक जारी
मुंबई : मुंबईत होम क्वारंटाइन रुग्णांना १७ दिवस घरीच राहावं लागणार आहे. महापालिकेने त्यासंदर्भातलं परिपत्रक जारी केलं आहे. लक्षणं नसलेले किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना एकूण १७ दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी पाळावा लागणार आहे. या कालावधीमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, असे महापालिका प्रशासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारित परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.
मुंबईत ३ एप्रिल रोजी ९ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाची भीषणता लक्षात येते.
रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर आरोग्ययंत्रणाही कमी पडू शकते.
त्यामुळे महापालिका प्रशासनाने होम क्वारंटाइन असलेल्या रुग्णांना १७ दिवस घरीच राहण्याचे निर्देश दिले आहेत.
फक्त इतकेच ICU बेड शिल्लक
मुंबईत कोरोना संसर्गाचं थैमान सुरू आहे. प्रशासनाने उभारलेली आरोग्य यंत्रणाही येत्या काहीच दिवसात अपूरी पडते की काय? अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच गंभीर रुग्णांचीही संख्या वाढल्याने मुंबईत फक्त २० टक्के ICU बेड शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईतील रुग्णालयांत रोज हजारोंनी नव्या रुग्णांची भर पडू लागलीये. ICUतही केवळ २०%बेड शिल्लक असल्याची महिती आकडेवारीवरून समोर आली आहे..
खाटांची संख्या २१ हजारापर्यंत वाढवण्याचे पालिकेचे प्रयत्न असले तरी वाढवेल्या खाटाही लगेचच भरत आहेत.
मुंबईतील ६९ नर्सिंग होमही पालिकेनं ताब्यात घेतले आहेत. सध्या मुंबईत ५८ हजारांहून अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत.
त्यापैकी सुमारे १० हजारांहून अधिक रुग्णांना लक्षणे आहेत, तर गंभीर रुग्णांची संख्याही वाढत असून सध्या ८९९ रुग्ण गंभीर आहे.