नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली.  देशात आतापर्यंत 139.70 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कोविड-19 लसीकरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार  1 मे ते 20 डिसेंबर दरम्यान सरकारी कोविड लसीकरण केंद्रांवर लसीचे 117.56 कोटी डोस देण्यात आले आहेत. तर खासगी लसीकरण केंद्रांवर सुमारे 4.18 कोटी डोस देण्यात आले आहेत.


लसीकरण मोहिमेवर किती खर्च
केंद्राने (Central Govt) कोविड-19 लसीच्या खरेदीवर आतापर्यंत 19 हजार 675 कोटी रुपये खर्च केले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये कोविड-19 लसीकरणासाठी (Covid-19 Vaccination) 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. 


राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत लस पुरवठ्यासाठी कोविड लसीच्या खरेदीवर केंद्राने 20 डिसेंबरपर्यंत  19,675.46 कोटी रुपये खर्च केले आहेत. सामाजिक कार्यकर्ते अमित गुप्ता यांच्या आरटीआय अर्जावर मिळालेल्या उत्तरात हि माहिती देण्यात आली आहे.


ओमायक्रॉनवरुन राज्यांना अलर्ट
दरम्यान, केंद्र सरकारने सर्व राज्यांना कोरोनाच्या नवीन प्रकार, ओमिक्रॉनबद्दल सतर्क केलं आहे.  ओमिक्रॉन प्रकार डेल्टापेक्षा तिप्पट संसर्गजन्य आहे आणि हे लक्षात घेता सर्व राज्यांनी खबरदारी घेत तयारी करावी असे निर्देशही केंद्राने दिले आहेत.


केंद्राचं सर्व राज्यांना पत्र
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्यांनी कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटबद्दल सावधगिरी बाळगावी. कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार राहावं. ओमायक्रॉनची कमी प्रकरणं नोंदवली गेली तरी त्यावर बारकाई लक्ष ठेऊन स्थानिक आणि जिल्हा पातळीवर तातडीने पावलं उचलावीत, असं राजेश भूषण यांनी म्हटलं आहे.