मुंबई: भाजप सरकारमुळे देशाच्या संविधानाला धोका निर्माण झाला आहे, अशी टीका जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी नेता कन्हैया कुमार याने केली. तो रविवारी 'यूनायटेड यूथ फ्रंट'च्यावतीने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाव रॅली'त बोलत होता. यावेळी कन्हैयाने मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून टीका केली. त्याने म्हटले की, राजधानी दिल्लीत देशाचं संविधान दिवसाढवळ्या जाळलं गेलं. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली गेली. तरीही याविरोधात कोणी आवाज उठवला नाही. मोदी सरकारनेही सोयीस्कररित्या मौन बाळगले. ही परिस्थिती पाहता देशातील हिंदू मुस्लिम नव्हे देशाचे संविधान धोक्यात असल्याचे स्पष्ट होते, असे कन्हैयाने सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच मोदी 'मन की बात' करतात पण कामाची बात करत नाहीत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी म्हणाले की, देशाला विरोधी नेत्याची गरज नाही. कारण काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नाही. परंतु, ज्या देशात विरोधी नेता नाही त्या देशाची लोकशाही ही हुकूमशाहीकडे जाते. २०१४ साली सत्तेत येण्याआधी मोदींनी देशातील जनतेला रोजगारनिर्मिती, महागाई कमी करण्याचे आणि प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते. यातील एकही आश्वासन मोदींनी पाळले नसल्याचे कन्हैयाने म्हटले. 


या संविधान बचाव रॅलीत कन्हैयासह गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांसह १४ राष्ट्रीय पक्षांच्या युवा नेते उपस्थित होते.