CSMT to Panvel : मुंबईची लाईफ लाईन, असं या शहरातील लोकल सेवेला संबोधलं जातं. हीच रेल्वे अनेकांचा प्रवास सुखकर करते, तर ती काहीशी घुटमळली की काहींचा मनस्तापही होतो. मुंबईतील या लोकल सेवेनं दर दिवशी मोठ्या संख्येनं प्रवासी प्रवास करतात. यामध्ये नोकरीच्या निमित्तानं दूरच्या ठिकाणांहून मुंबई गाठणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. अशा सर्वच प्रवाशांच्या गरजा लक्षात घेत आता रेल्वे विभागानं अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच मोठा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे विभागाच्या या निर्णयामुळं सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ आता 80 मिनिटांवरून थेट 65 ते 70 मिनिटांवर आला आहे. रेल्वे गाड्यांची वेगमर्यादा वाढवण्यासाठी सध्या यंत्रणा काम करत असून, टीळक नगर ते पनवेल या टप्प्यादरम्यान रेल्वेचा वेग वाढवला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


हेसुद्धा वाचा : हिवाळ्यात नेमकं किती वेळ मॉर्निंग वॉक करावं? तज्ज्ञ काय म्हणतायेत लक्षात ठेवा 


उपलब्ध माहितीनुसार मध्य रेल्वेच्या वतीनं सीएसएमटी- पनवेल मार्गावर 188 आणि सीएसएमटी ते बेलापूर मार्गावर 79 रेल्वे गाड्या चालवल्या जातात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आता ठाणे आणि पनवेल मार्गावरील गाड्यांचा वेग ताशी 80 किमीवरून 105 किमीवर आणण्यासाठीचं काम सुरु आहे, ज्यामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


काही ठिकाणी वेग वाढवणं अशक्य 


सूत्रांच्या माहितीनुसार सीएसएमटी- टिळक नगर दरम्यान रेल्वेचा वेग वाढवता येणार नाही. कारण, इथं रेल्वे स्थानकांमधील अंतर फार कमी असल्यामुळं ट्रेन सर्वाधिक वेग गाठून त्यानंतर वेग कमी करण्यास असमर्थ ठरू शकते. याशिवाय या मार्गावर रेल्वे रुळाला लागूनच टिळक नगर, वडाळा स्थानकांदरम्यान मोठी वस्ती आहे. त्यातच चुनाभट्टी आणि कुर्ला टिळक नगरदरम्यान लेवल क्रॉसिंग असल्यामुळं रेल्वेचा वेग वाढवण्यात अडचणी येत असल्याची माहिती यंत्रणांकडून देण्यात आली आहे. दरम्यान सध्याच्या घडीला निर्धारित स्थानकांमधील वेग वाढवण्यासाठीचं काम हाती घेण्यात आलं असून, पुढच्या वर्षापर्यंत त्यासाठीची अंमलबजावणी सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.