मुंबई : भारत-पाकिस्तानात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचं अधिवेशन आज गुंडाळलं जाण्याची शक्यता आहे. विनियोजन विधेयक मंजूर करून घेतलं जाईल आणि अधिवेशन संपवलं जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि राज्यातल्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. विधानभवनात झालेल्या या बैठकीला राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आणि मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल उपस्थित होते. अधिवेशनामुळे विधिमंडळ परिसरात मोठी सुरक्षा यंत्रणा लागते. विधानभवन आणि आझाद मैदानात हजारो पोलीस व्यस्त असतात. हा भार कमी करण्यासाठी अधिवेशन लवकर संपवण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्तांनी केली होती. त्याला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला असून आज सकाळी १० वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अधिवेशन संपवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आज सेवानिवृत्त होत आहेत. सध्या राज्यात दत्ता पडसलगीकर यांच्यानंतर सेवा जेष्ठतेनुसार मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे पडसलगीकर निवृत्त झाल्यानंतर सुबोध जयस्वाल त्यांची जागा घेण्याची दाट शक्यता आहे. 


दुसरीकडे सीमेवर सलग सातव्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय.  बुधवारी आणि गुरुवारी रात्री पाकिस्तानी सेनेकडून जम्मू-काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. रात्रभर या ठिकाणी गोळीबार सुरू होता. भारतीय लष्करानंही सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केलीय. शहरी भागाला पाकिस्तानकडून लक्ष्य केलं जातंय. प्रचंड गोळीबार सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे.