मुंबई - शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीने आज कोर्टच्या आदेशानुसार पहिल्या सुनावणीसाठी हजेरी लावली होती. गुलाबी आणि राखाडी रंगाची साडी, हलका मेक अप आणि गॉगल लावून इंद्राणी आज कोर्टमध्ये दाखल झाली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात आज सुनावणी होती. दरम्यान आज न्यायाधीशांची अचानक सुट्टी असल्याने पुढील सुनावणी 9 जूनला ठेवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिला पती आणि इंद्राणीची चुकामूक
सर्वात प्रथम सिद्धार्थ दास या व्यक्तीबरोबर इंद्राणी मुखर्जी रिलेशनशिपमध्ये होती. त्यांनी विवाह केला नव्हता मात्र सिद्धार्थ दासपासून शीना बोरा आणि मिखाईल बोरा अशी दोन मुले इंद्राणीला झाली. संजीव खन्ना याच्याशी इंद्राणीने पहिला तर पीटर मुखर्जी याच्याशी दुसरा विवाह केला होता. यातील संजीव खन्ना याच्यापासून इंद्राणीला विधी नावाची मुलगी आहे. इंद्राणी आणि संजीव खन्ना म्हणजे आई आणि सावत्र वडिलांनी शीना बोरा हीच खून केल्याचा आरोप आहे. यामुळे या प्रकरणात संजीव खन्नादेखील आरोपी आहे. आज सुनावणी असल्याने आरोपी संजीव खन्नादेखील पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. आज दुपारी 12 वाजता सुनावणी असल्याने तो त्यापूर्वीच न्यायालयात हजर झाला होता. न्यायाधीश सुट्टीवर असल्याने आणि सुनावणी पुढे ढकलली गेल्यामुळे पोलीस संजीव खन्नाला न्यायालयातून परत तुरूंगात घेऊन गेले. जसा संजीव खन्ना न्यायालयातून निघून गेला तशी इंद्राणी मुखर्जी न्यायालयात हजर झाली. यामुळे दोघांची भेट होऊ शकली नाही. इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी या प्रमुख आरोपींना या प्रकरणात जरी जामीन मिळाला असला तरी संजीव खन्नाला अजूनही जामीन मिळाला नसल्याने तो तुरूंगातच आहे.


राहुल मुखर्जीची साक्ष ठरणार महत्वपूर्ण
शीना बोरा हत्याकांडात प्रकरणात  मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात आज आरोपी पीटर मुखर्जी यांचा मुलगा राहुल मुखर्जीची याची आज साक्ष होणार होती. या खटल्यात राहुल मुखर्जी हा महत्वपूर्ण साक्षीदार आहे. मात्र न्यायाधीशच सुट्टीवर असल्याने राहुल मुखर्जी याची साक्ष आजही न्यायालयासमोर नोंदवली गेली नाही.


आपल्याच मुलीच्या हत्येचा आरोप असलेल्या इंद्राणी मुखर्जीच्या चेहऱ्यावर ना पश्चात्तापाची भावना दिसते ना दोषी असल्याची भावना दिसते. अगदी तुरूंगातून बाहेर पडल्यावरही तिने अगदी हसत हसत माध्यमांना मुलाखती दिल्या होत्या. आजही न्यायालयात ती माध्यमांच्या प्रतिनिधींशी हसत हसत संवाद साधताना दिसली. 


झी न्युज, मेघा कुचिक, मुंबई