मुंबई : भायखळा जेलमध्ये महिला कैदी मंजुळा शेट्येची हत्या होऊन ४ दिवस उलटलेत. या प्रकरणी भायखळा जेलच्या अधिक्षक मनीषा पोखरकरसह एकूण ६ जणांवर ३०२ चा गुन्हा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल होऊनही अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही. यामुळे मुंबई पोलीस निःपक्षपातीपणे तपास करताहेत का? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत पोलिसांना विचारलं असता त्यांनी तपास सुरु आहे असंच ठोकळेबाज उत्तर दिलं. तर जेल प्रशासनाने हात वर करत मुंबई पोलिसांकडे बोट दाखवलं. अगदी सिनेमात घडावा तसा प्रकार  भायखळा जेल मघ्ये घडला आणि एकच हाहाःकार झाला. महिला कैदी मंजूला शेट्ये हीला बेदम मारहाण करण्यात आली , त्यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी भायखळा जेलच्या जेल अधिक्षक मनीषा पोखरकर यांच्यासह एकूण ६ जेल पोलीसांवर शनिवारी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नाहीये. यामुळं मुंबई पोलीस, जेल मघील आरोपी पोलीसांना वाचविण्याचा प्रयत्न करतायेत का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.


जेल प्रशासनाला याबाबत विचारले असता त्यांनी हातच वर केलेत. कारागृह विभाग मंजुळा शेट्ये प्रकरणाचा स्वतंत्र चौकशी करते आहे. या तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य केले जाईल. ज्या सहा पोलीस कर्मचा-यांवर कलम ३०२ म्हणजे खून करणे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यांना अजून अटक का झाली नाही, याबाबात शंका उपस्थित करण्यात येत आहे. 


शिना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी, जी सध्या याच कारागृहात आहे, तिने एक अर्ज केलाय, त्या अर्जात खळबळजनक माहिती समोर आली आहे.  यात इंद्राणीवर लैगिंक अत्याचार?, मंजुला शेट्ये प्रकरणात मला जेलमधील पोलिसांनी मारहाण केलीय आहे. माझ्या डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झालीय आहे, एवढचं नाही तर वारंवार शिवीगाळ आणि लैंगिक अत्याचार करण्याची धमकी दिली आहे, हे सर्व मला न्यायालयाला सांगायचं आहे.
 
इंद्राणी मुखर्जीने हा अर्ज विशेष सीबीआय न्यायालयात केलाय. याप्रकरणी तिला बुधवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले गेलेत. इंद्राणी मुखर्जी आता न्यायालयात जेलमध्ये झालेली  मारहाण आणि मंजूला शेट्ये मृत्यू प्रकरणावर काय खुलासा करतेय याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.