`बाबासाहेबांचा पुतळा मेड इन चायना नव्हे, मेड इन इंडिया हवा`
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची निर्मिती चीनमध्ये करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी
मुंबई: महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक इंदूमिल मध्ये उभारण्यात येत असून या स्मारक कामाचा आढावा सोमवारी रिपब्लिकन पक्षाच्या आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदावर असणाऱ्या रामदास आठवले यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला.इंदुमिलमध्ये उभारण्यात येणारा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा आणि त्या पुतळ्याचा चौथरा चीन मध्ये बनवण्याचा निर्णय रद्द करून भारतातच हा पुतळा बनवावा. त्यासाठी शिल्पकार राम सुतार यांची तयारी असून भारतात काही जणांना रोजगार मिळेल. चीन मध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून आशा परिस्थितीत तेथून पुतळा बनवून घेणे योग्य होणार नसल्याची सूचना आठवले यांनी केली आहे.
इंदुमिल आणि चैत्यभूमीच्या दरम्यान समुद्राजवळून रस्ता तयार केला जाणं महत्त्वाचं असल्याचं सांगत त्यासाठी लागणारी सीआरझेडची पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळवून देण्यास आपण पुढाकार घेणार असल्याचा विश्वास आठवले यांनी दिला.इंदुमिल मध्ये डॉ आंबेडकर यांचा पुतळा आणि पुतळ्याचे फाउंडेशन चे काम बाकी असून स्मारक कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यात स्मारकातील नियोजित विविध सभागृहांच्या कामापैकी 70 टक्के काम पूर्ण झालं आहे, तर स्मारकाच्या फाउंडेशन चे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. बेसमेंटचे काम 72 टक्के झाले आहे अशी माहिती शापुरजी पालनजी कंपनी चे व्यवस्थापक उमेश साळुंखे यांनी दिली.
स्मारकासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर
इंदुमिल मध्ये उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामासाठी १ हजार ८९ कोटी चा निधी मंजूर झाला असून, त्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची हमी MMRDA ने दिली आहे. या स्मारकाचं काम पूर्ण होण्यास जवळपास तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. सध्याच्या घडीला लॉकडाऊनच्या काळात स्मारकाचं काम दोन महिन्यांसाठी हे काम थांबवण्यात आलं होतं. शिवाय परप्रांतीय मजूर आपल्या मुळ गावी परतल्यामुळे कामगारांची वानवा निर्माण झाली आहे. असं असं असलं तरीही युद्धपातळीवर स्मारकाचं काम सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
महानगरपालिकेला आठवलेंची आणखी एक सूचना
चैत्यभूमीपाशी दिक्षाभूमीप्रमाणे एक भव्य स्तूप असावा अशी सूचना आठवलेंनी महापालिकेला केली. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चैत्यभूमीच्या स्तुपाला हानी पोहोचते, त्यामुळे चैत्यभूमीसारखा भव्य स्तुप उभारण्यात येण्याबाबतची विचारणा त्यांनी केली आहे. शिवाय चैत्यभूमीपाशी समुद्राच्या दिशेने रस्ता वाढवण्यासाठी सध्या उभारण्यात आलेली भिंत वाढवावी अशी सूचनाही त्यांनी केली.