मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात यश येत आहे. त्यामुळे यापुढे अधिकची खबरदारी घेण्याची गरज आहे. कोणताही निष्काळजीपणा हा घातक ठरु शकेल. कोरोनानंतरच्या उपचारासाठीची व्यवस्था करणे आवश्यक आहे. म्हणून महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरु करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ८० टक्के रुग्ण हे १० राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविले तर देश जिंकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अन्य आजार झाल्याचे निदर्शनास आले असून कोरोनानंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. 



कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.


याकाळात शिवभोजन योजनेच्या माध्यमातून महिन्याला लाखो लोकांना केवळ ५ रुपयांमध्ये जेवणाची सोय केली. राज्यातील गरीब जनतेला याचा मोठा लाभ झाला आहे. मागच्या आठवड्यात कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालकांना व मातांना दुध भूकटी मोफत देण्याचा निर्णय देखील राज्यशासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या लोकांना इतर आजार झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर कोरोनानंतरही उपचार व्हावे यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात साथ रोग नियंत्रण रुग्णालय मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करणार असल्याचे ते म्हणाले.


इमिनॉलॉजी लॅबची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री  ठाकरे यांनी यावेळी सांगितले, विविध प्रकारच्या विषाणूंचा प्रादुर्भाव कसा आणि का होतो यावर संशोधन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जे उद्या करायचे ते आज आणि आज करायचे ते आत्ता असे उद्याचे जग कोरोनाने आजच दाखवले.