मुंबई : मुंबै बँक अर्थात मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी चौकशी होणार आहे. ही चौकशी ईडीकडून होणार आहे. त्यामुळे आता कोणावर कारवाई होणार याकडे लक्ष लागलेय. दरम्यान, बँकेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार प्रविण दरेकर यांच्या मेव्हण्याच्या खात्यावर गैरव्यवहाराचा पैसा वळता झाल्याचा आरोप होतो आहे. त्यामुळे दरेकर अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅंकेने सर्वसामान्य लोकांच्या नावावर कर्जप्रकरणे करून त्याचा पैसा मात्र दुसरीकडे वळवला गेल्याचे समोर आले होते. बँकेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार प्रविण दरेकर यांच्या मेव्हण्याच्या खात्यावर यातील बराचसा पैसा वळता झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे दरेकर यांच्या मेव्हण्याची चौकशी होणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.


तसेच मुंबै बँकेतील गैरव्यवहाराबाबत नाबार्डनेही ताशेरे ओढले होते. हे प्रकरण मनी लाँडृींग असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे मुंबै बँकेतील मनी लाँडृींगप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु होणार आहे. दरम्यान, भाजप आमदार प्रविण दरेकरांच्या मेव्हण्याच्या बँक खात्याचे तपशील मागविण्यात आले आहेत. आता या तपशीलात काय निघणार, याची उत्सुकता आहे.


दरम्यान, नाबार्डनेही आपल्या रिपोर्टमध्ये मनी लाँडृींग झाल्याचे नमूद करत मुंबई बँकेला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु बँकेने दोन्ही शाखांच्या शाखाधिकाऱ्यांना बडतर्फ करत महेश पालांडे याच्यावर मात्र कोणतीच कारवाई केली नव्हती, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत होते.


काय आहे हे प्रकरण?



अंधेरीतील एका खासगी कुरियर कंपनीत कुरियर बॉय म्हणून नोकरी करणारे १५ जण गेल्या दीड दोन वर्षांपासून अन्यायाविरोधात दाद मागत आहेत. या सर्वांनी मुंबै बँक अध्यक्ष प्रविण दरेकरांचा मेव्हणा महेश पालांडेंच्या मदतीने मुंबै बँकेच्या कांदिवली ठाकूर व्हिलेज शाखेतून कर्जप्रकरणे केली होती. पगार कमी असतानाही क्षमतेपेक्षा अधिक रकमेची म्हणजे प्रत्येकी ३ लाखांचे कर्ज दोन दिवसांत मंजूरही झाले होते. परंतु त्यांच्या खात्यावरचा कर्जाचा पैसा आलेला नाही. मात्र, हा पैसा दुसऱ्यांच्या खात्यावर वळवला गेला. त्यामुळे १५ जण चिंतेत होते.


बॅंकेकडून मंजूर करण्यात आलेला पैसा हा बॅंक अध्यक्ष प्रविण दरेकर यांचा मेव्हणा महेश पालांडे आणि त्याच्या पत्नीच्या खात्यावरही वळवण्यात आल्याचे दिसून येत आहे. मात्र, पैसे मिळालेले नसतानाही कर्ज फेडण्यासाठी बँकेकडून तगादा आणि नोटीसही या १५ जणांना येत आहेत. त्यामुळे ते त्रस्त आहेत. पैसा न घेता कर्जाचे पैसे कसे फेडायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.


या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनीही ४ वेळा बैठक घेवून पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते त्यांनी पाळले नाही, अशी माहिती पिडीत कर्जदार विनायक जाधव, जगन्नाथ कोंडविलकर आणि सुरेश कदम यांनी दिलेय. त्यानंतर हे प्रकरण  'झी २४ तास'ने लावून धरले. आता या प्रकणाची ईडीकडून चौकशी होणार असल्याने हा 'झी २४ तास'च्या बातमीचा दणका आहे.


ठळक बाबी


- मुंबै बँक गैरव्यवहारप्रकरणी आता ईडीचा फेरा
- मुंबै बँकेतील मनी लाँडृींगप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू
- प्रविण दरेकरांच्या मेव्हण्याच्या बँक खात्याचे तपशील मागवले
-'झी २४ तास'च्या बातमीचा दणका
- मुंबै बँकेला रिपोर्ट सादर करण्याचे आदेश
- मुंबै बँकेने रिपोर्ट सादर करण्यासाठी वेळ वाढवून घेतला
- कर्जदारांच्या खात्यातून परस्पर पैसे वळवल्याचे प्रकरण
- मुंबै बँकेच्या अशोकवन, दहिसर आणि ठाकूर व्हिलेज, कांदिवली या दोन शाखांमध्ये झालीय अफरातफर
- प्रविण दरेकरांचा मेव्हणा महेश पालांडे आणि त्याच्या पत्नीच्या खात्यात सामान्य कर्जदारांचे वळवण्यात आलेत पैसे
- नाबार्डनेही आपल्या रिपोर्टमध्ये मनी लाँडृींग झाल्याचे नमूद करत बँकेला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु बँकेने दोन्ही शाखांच्या शाखाधिकाऱ्यांना बडतर्फ करत महेश पालांडेवर मात्र कुठलीच कारवाई केली नव्हती.