...म्हणून आंतरजिल्हा एसटी वाहतुकीचा निर्णय बदलला- अनिल परब
रेड झोनमधून लोकांना आमच्या जिल्ह्यात सोडू नका असा विरोध
मुंबई : कोरोनाचा फ़ैलाव रोखण्यासाठी सध्या तरी आंतरजिल्हा एसटी वाहतूक बंद रहाणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. ही वाहतूक टप्प्याटप्याने सुरु करण्यात येणार आहे. रेड झोनमधून लोकांना आमच्या जिल्ह्यात सोडू नका असा विरोधाचा सूर उमटल्यानंतर हा निर्णय घ्यावा लागल्याचे परब म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. सुरुवातील ग्रीन झोन संदर्भातील विचार होणार असून रेड झोन संदर्भात सध्या विचार नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे मुंबई, पुण्यातून लवकर एसटी सेवा सुरु होण्याची शक्यता सध्या दिसत नाही.
परराज्यातील लोकांना आपल्या राज्यात जाण्यासाठी सीमेपर्यंत आणि सीमेवर आपल्या राज्यात लोकांना त्यांच्या तालुक्यात सोडण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना त्यांच्या तालुक्यात सोडण्याचा निर्णय घेतला होता असेही ते म्हणाले.
हे वाचा : दिवसभरात एसटीने ८ हजार मजुरांचा इच्छित स्थळी प्रवास
रेड झोनमधून लोकांना आमच्या जिल्ह्यात सोडू नका असा विरोध झाला. मुंबईतून कोरोना आमच्या गावात येईल यासाठी विरोध झाला. त्यामुळे निर्णय बदलल्याचे परब यावेळी म्हणाले. गावकऱ्यांचा विरोध झाल्यास संबधित जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे एसटी वाहतूक टप्प्याटप्याने सुरू करण्याबाबत आम्ही निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी दिली. यासदंर्भात आंतरजिल्हा बाबत बैठक होणार आहे.
एसटी स्टॅन्डवर जाण्याची घोषणा आम्ही केली नव्हती. एसटी स्टॅण्डवर गर्दी करु नका, सरपंच आणि पोलीसांशी संपर्कात राहा असे अवाहन देखील परब यांनी यावेळी केले.