अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : मुंबईकरांना एन्जॉय करण्यासाठी आता नवं निमित्त मिळणार आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनसचं आज भूमीपूजन झालं. यानिमित्तानं मुंबईची झगमग आणखीनच वाढणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत आता क्रुझवरच्या पार्ट्या, मजा-मस्ती करता येणार आहे. परदेशातल्या क्रुझचं स्वागत करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये अत्याधुनिक आणि भव्य असं आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल उभं रहाणार आहे. सध्या फक्त परदेशातच अशी मजा लुटता येत होती.


३०० कोटींचा हा प्रकल्प आहे. ४.१५ लाख चौरस फुटांवर त्याचं बांधकाम होणार आहे. दरवर्षी ७ लाख एवढी प्रवासी क्षमता या टर्मिनसची असेल. दरवर्षी या टर्मिनलवर २०० क्रूझ येऊ शकतील. हे टर्मिनस ३६५ दिवस कार्यान्वित रहाणार आहे.


देशातलं हे पहिलं आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस असून सागरमाला प्रकल्पांतर्गत याचा समावेश होणार आहे. समुद्रातल्या क्रूझ पर्यटनाला यामुळे चालना मिळणार आहे. जून २०१९ पर्यंत क्रूझ टर्मिनसचं बांधकाम पूर्ण होईल. २०४१ पर्यंत २८,४०० कोटी रुपयांची उलाढाल करण्याची क्षमता या टर्मिनसमध्ये आहे.


मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये देशातलं सगळ्यात मोठं गार्डन तयार करण्यात येणार आहे. सिंगापूर गार्डनच्या धर्तीवर साडेतीनशे एकर जागेवर गार्डन उभं राहणार आहे. मुंबईत येणा-यांना मोकळा श्वास घेण्यासाठी, मनोरंजनासाठी मोठं साधन उपलब्ध होणार आहे. यानिमित्तानं हे सिमेंटचं शहर हिरवाईचं स्वप्न पाहतंय. झगमगत्या मुंबईला आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या निमित्तानं चार चाँद लागणार आहेत. त्यासाठी फक्त 2019 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.