राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सव होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असून गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचा यामागे उद्देश आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली आहे. 19 ते 28 सप्टेंबर या काळात महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे.
मुंबई : पर्यटनाला चालना देण्यासाठी, पारंपारिक कला आणि संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना (Tourists) करुन देण्यासाठी तसंच गणेशोत्सवला (Ganeshotsav) आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटनात्मक प्रसिद्धी देण्यासाठी राज्यात 'आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवा'चे (Internationl Ganesh Festival) आयोजन करण्यात येणार आहे. 19 ते 28 सप्टेंबर या दरम्यान मुंबई, पुणे, पालघर आणि रत्नागिरी इथं या महोत्सवाचें आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे.
राज्यात पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी पर्यटन संचालनालयाद्वारे (Directorate of Tourism) या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. गणेशोत्सव हा कला, सांस्कृतिक वारसा तसंच लोकांच्या एकात्मतेचे दर्शन घडविण्याचं माध्यम आहे. पारंपारिक कला आणि सांस्कृतिक ठेवा महोत्सवाच्या (Festival) माध्यमातून जगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. महोत्सवा दरम्यान विविध राज्यातील पर्यटनाशी निगडीत भागधारक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, प्रवासी पत्रकार आणि समाजमाध्यम प्रभावक तसंच विदेशी वाणिज्य दुतावासाचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
त्यांना मुंबई, पुणे, पालघर आणि रत्नागिरी इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसंच रत्नागिरीतील गणेश दर्शन तसंच सांस्कृतिक वैभव दाखविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली.
या महोत्सवांतर्गत गेटवे ऑफ इंडिया इथं श्री गणेशाच्या विविध स्वरुपांवर केंद्रीत विशेष सांस्कृतिक केंद्रांची उभारणी, वाळूशिल्प, मॉझेक आर्ट, स्क्रॉल आर्टचे प्रदर्शन, गेटवे ऑफ इंडियाच्या भव्य दर्शनी भागावर प्रोजेक्शन मॅपींगच्या माध्यमातून देशभक्तीपर यशोगाथा कथन करणारे कार्यक्रम, महाराष्ट्राचे पारंपारिक आदिवासी वारली संस्कृतीचे दर्शन घडविणारे वारली कलेचे कार्यशाळा, विविध कारागिरांद्वारे निर्मित हस्तकला वस्तुचे कलादालन, पारंपारिक कला तसंच लोककला संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम 10 दिवसीय गणेशोत्सव महोत्सवांतर्गत विविध ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत.
गणेशोत्सव या सणाला ऐतिहासिक वारसा आहे. राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा अनेक देशी आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करत असतो. आपण आपली संस्कृती या महोत्सवाच्या माध्यमातून इतरांना सांगू शकतो. आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि सांस्कृतिक जाणकारांची उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्राच्या विशाल आणि दहा दिवस चालणाऱ्या या गणेश महोत्सवामध्ये गणेश भक्त, पर्यटन प्रेमी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांनी केलं आहे.