इंटरसेक्स डॅनियल मॅन्डोन्साच्या संघर्षाची कहाणी
आपल्या `इंटरसेक्स` असण्याला समाज मान्यता आणि आदर मिळावा यासाठी तो झगडतोय.
प्रविण दाभोळकर, झी मीडिया,मुंबई : 'एलजीबीटी' म्हणजेच 'लेसबीन', 'गे', 'बायोसेक्शुयल', 'ट्रान्सजेंडर' या कम्युनिटीबद्दल आपण आजवर ऐकलं असेल. पण 'इंटरसेक्स' कम्युनिटीबद्दल तुम्हाला माहितेय का? ही कहाणी आहे इंटरसेक्स असलेल्या डॅनियलची. आपल्या 'इंटरसेक्स' असण्याला समाज मान्यता आणि आदर मिळावा यासाठी तो झगडतोय.
द्विलिंगी डॅनियल
चर्चगेटच्या निर्मला निकेतन महाविद्यालयात सध्या आनंदाचं वातावरण आहे. महाविद्यालयात बीएसडब्ल्यूला शिकणारा डॅनियल मेंडॉन्सा मुंबई विद्यापीठातून दुसरा आलाय.
त्यामुळे डॅनिअलच चहूबाजूने कौतुक होतयं. यामागच कारणही तसंच आहे. कारण डॅनियल हा इंटरसेक्स म्हणजेच द्विलिंगी आहे.
शरीर पुरूषाचं असलं तरी महिलेप्रमाणे त्याला मासिक पाळीही येते. त्यामुळे तो इतर मुलांपेक्षा वेगळा ठरतो. समाजाने नाकारले असतानाही जिद्दीच्या जोरावर तो इथवर पोहोचलायं.
४ वर्षाचा असताना वडिलांनी डॅनियलला तृतीयपंथ्यांकडे विकलं. पण पोटचा गोळा कसाही असला तरी त्यापासून दूर राहू न शकलेल्या त्याच्या आईने त्याला पुन्हा घरी आणलं.
त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. पदवी शिक्षणानंतर तो आता बीएसडब्ल्यू झालाय. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना याचा अभिमान आहे.
३ वर्ष वेगळ टॉयलेट
एकूण शरिराची रचना वेगळी असल्यामुळे पुरूषांच्या टॉयलेटमध्ये जायला डॅनियलला संकोच वाटायचा. यावर महाविद्यालयाने पुढाकार घेऊन त्याच्यासाठी ३ वर्ष वेगळ्या टॉयलेटची व्यवस्था केली असल्याचे 'निर्मला निकेतन' महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ, लिड्विन डाईस यांनी सांगितले.
डॅनियलने आपल्या प्रेमळ वागण्यामुळे महाविद्यालयातील सुरक्षा रक्षक, सपोर्ट स्टाफ, लायब्ररीत सगळ्यांशी त्याचं मैत्रीचं नात तयार केल्याचे सहाय्यक कर्मचारी संतोष जगताप यांनी सांगितले.
आत्महत्येचा प्रयत्न
डॅनिअलच्या वेगळ्या वागण्या-बोलण्याने त्याची खिल्ली उडवली जायची. हिजडा, बायल्या, छक्का असे म्हणून त्याला डिवचले जायचे. यातून आलेल्या मानसिक ताणामुळे त्याने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने तो वाचला. डॅनिअलला नव आयुष्य मिळालयं.
सध्या तो भाईंदर येथे राहत असून 'युवा' सामाजिक संस्थेत 'कम्युनिटी'लेवलला काम करतोय. कामाच्या ठिकाणीही त्याने जेंडर अवेअरनेस केला आणि मोठा बदल तिथेही झाला. डॅनियलने 'युवा' संस्थेत आल्यापासून कामाच्या ठिकाणीही जेंडर अवेअरनेस केलाय.
तो आमच्या संस्थेतील हुशार, मनमिळावू असा सहकारी असल्याचे 'युवा'सामाजिक संस्थेच्या सिनियर असोसिएट डोयेल जयकिशन यांनी सांगितले.
बाळाला जन्म द्यायचाय
समाजाला त्याने आहे तसं स्वीकारलं. ही वेळ रडायची नाही तर आपलं अस्तित्व नाकारणाऱ्यांशी लढायची आहे, हे त्याने ठरवल.
त्या हेतून समाजसेवा क्षेत्रात करियर करतोय . एका पुरूषासोबत लग्न करुन बाळाला जन्म द्यायची त्याची ईच्छा आहे.
समाज स्वीकारणार का ?
डॅनियलचा संघर्ष एवढ्यावरच थांबला नाहीए. सध्या तो वेगवेगळ्या वस्त्या, ख्रिश्चन धर्मगुरू आणि पोलिसांसोबत जेंडर अवेअरनेसवर काम करतोय. आपला समाज केवळ स्त्री आणि पुरूषांचाच नाही तर थर्ड जेंडर्सचाही आहे, यासाठी सरकार दरबारी भांडतोय.
डॅनियल सारख्या हजारो तरुण 'समाजा'ला स्वीकारलयं. पण समाज यांना कधी स्वीकारणार हे पाहणं महत्त्वाच आहे.