Ratan Tata To sell Shares In IPO: टाटा समुहाचे सर्वेसर्वा आणि टाट सन्स कंपनीचे मानद सदस्य असलेले रतन टाटा यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचे त्यांच्याकडील शेअर्स सर्वसामान्यांना आयपीओच्या माध्यमातून घेण्याची सुवर्णसंधी आहे. आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये शेअर बाजारातील मोठ्या घडामोडींपैकी एक घडामोड टाटांच्या या एका निर्णयामुळे घडणार असल्याचं सांगितलं जात आहे.


कोणत्या कंपनीमधील शेअर्स विकणार रतन टाटा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीओच्या माध्यमातून रतन टाटा किड्स वेअर स्टार्टअप असलेल्या 'फर्स्टक्राय'मधील 77 हजार 900 शेअर विकणार आहेत. 86 वर्षीय रतन टाटा यांनी ब्रेनबीज सोल्यूशन कंपनीमध्ये 66 लाख रुपयांना 0.02 टक्के भागीदारी खरेदी केली होती. 2016 मध्ये 'फर्स्टक्राय' या ब्रॅण्ड नेमअंतर्गत लहान मुलांच्या कपड्यांचा उद्योग या कंपनीने सुरु केला होता. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडे 'फर्स्टक्राय' मार्फत दाखल करण्यात आलेल्या ड्राफ्ट रेडी हेरिंग प्रॉस्पेक्टमधून (डीआरएचपी) असं दिसून आलं आहे की टाटांकडे असलेल्या शेअर्सची सरासरी किंमत 84.72 रुपये प्रती शेअर इतकी आहे. म्हणजेच कंपनीमधील एकूण गुंतवणूक 66 लाख रुपये आहे.


टाटा अनेक स्टार्टअपमध्ये एंजल इनव्हेस्टर


अनेक दशकांपासून टाटा कंपनीचं नेतृत्व करणाऱ्या रतन टाटांनी आयवेअर रिटेलर लेन्सकार्ट, डिजीटल पेमेंट कंपनी पेटीएम, इलेक्ट्रिक वाहन कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबॅलिटी आणि ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म अपस्टॉक्ससारख्या स्टार्टअपमध्ये एंजल इनव्हेस्टर म्हणून गुंतवणूक केली आहे.


1816 कोटी रुपयांपर्यंतच्या फ्रेश शेअर्सचा लॉट


'फर्स्टक्राय'च्या आयपीओ साईजबद्दलची माहिती मिळालेली नाही. यामध्ये 1816 कोटी रुपयांपर्यंतच्या फ्रेश शेअर्सचा लॉट इश्यू केला जाईल असं मानलं जात आहे. ओएफएसमध्ये सॉफ्ट बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, यूएल प्रायव्हेट इक्विटी फंड टीपीजीसारख्या विद्यमान गुंतवणूकदारांकडून 54.4 मिलियन शेअर्सच्या विक्रीचा समावेश आहे, असं वृत्त 'इकनॉमिक टाइम्स'ने दिलं आहे.


टाटांबरोबरच या कंपन्याही विकणार शेअर्स


'फर्स्टक्राय'मधील शेअर्स विकणाऱ्या इतर शेअरधारकांमध्ये पीआय अपॉर्च्युनिटीज फंड, टीपीजी, न्यूक्वेस्ट एशिया, एप्रीकॉट इन्वेस्टमेंट्स, वॅलेंट मॉरीशस पार्टर्नस, टीआयएमएफ होल्डिंग्स, थिंक इंडिया अपॉर्न्युनिटीज मास्टर फंड, श्रोडर्स कॅपिटल प्रायव्हेट इक्विटी एशिया या कंपन्यांच् मसावेश आहे.


का विकले जात आहेत शेअर्स? आयपीओच्या पैशांचं काय करणार कंपनी


आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 'फर्स्टक्राय'मध्ये वाढत्या गुंतवणुकीमुळे तोटा सहा पट्टींनी वाढला आहे. कंपनीने आयपीओमधून मिळालेल्या पैशांच्या माध्यमातून भारत आणि सौदी अरेबियामधील दुकानांचा विस्तार करणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच भारतामधील दुकानांची संख्या वाढवण्याची कंपनीची योजना आहे.


(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)