इराणी टोळक्यांचा कल्याण पोलिसांवर हल्ला
चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आजवर अनेकदा हल्ले झालेयत.
कल्याण : इराणी टोळक्याने पोलिसांवर हल्ला करण्याची घटना पुन्हा एकदा कल्याणमध्ये घडलीय. सोनसाखळी चोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर इराणी जमावाने कल्याणजवळच्या आंबिवलीत हल्ला केला. याप्रकरणी तीन जणांना रात्री उशिरा पोलिसांनी अटक केलीये.
सोनसाखळीसाठी कुप्रसिद्ध
कल्याणजवळच्या आंबिवलीत इराणी समाजाची मोठी वस्ती आहे. हे इराणी सोनसाखळी चोरी करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. अशाच एका सोनसाखळी चोरीच्या प्रकरणात संशयित आरोपी आंबिवलीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ठाणे गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिटचं पथक आंबिवलीत गेलं होतं. मात्र संशयित आरोपी अब्बासी शाजोर इराणी याला ताब्यात घेऊन येत असताना आंबिवलीच्या रेल्वे फाटकाजवळ इराणी समाजाच्या जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला. यावेळे लाकडी दांडक्यांनी पोलिसांना मारहाण करण्यात आली , या घटनेत सहा पोलीस अधिकारी जखमी झाले. या सगळ्या गोंधळात ताब्यात घेतलेला आरोपी अब्बासी इराणी पळून गेला.
तीन जणांना अटक
या प्रकारानंतर पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई करत ,हल्ला करणाऱ्या तीन जणांना अटक केली, यामध्ये दुपारी पळून गेलेल्या अब्बासी इराणी याचाही समावेश आहे. या तिघांसह महिला आणि पुरुष अशा तब्बल २५ ते ३० जणांविरोधात कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कडक कारवाईची गरज
आंबिवलीच्या इराणी वस्तीत सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आजवर अनेकदा हल्ले झाले असून मागील वर्षी पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्नही झाला होता. त्यामुळे या इराणी टोळक्यावर आता कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झालीय.