शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन विधानपरिषदेत गोंधळ, कामकाज तहकूब
कर्जमाफीच्या मुद्दावरुन विरोधक आक्रमक
अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : विधानपरिषदमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मुद्दावरुन विरोधक आक्रमक झाले. यामुळे १० मिनिटांकरता विधानपरिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले.
कर्जमाफी प्रक्रिया पुर्ण कधी होणार असा प्रश्न शिवसेनेचे आमदार किशोर दराडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला विचारला. हाच मुद्दा पकडत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कर्जमाफी योजना फसली असल्याचा आरोप केला. एवढंच नाही तर 2017 च्या दिवाळीत कर्जमाफीची घोषणा झाल्यावर अशोक मनवर या शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांनी प्रमाणपत्र दिले. मात्र अजूनही त्याची कर्जमाफी झालेली नसल्याचा गौफ्यस्फोट करण्यात आला.
मात्र, आत्तापर्यंत 50 लाख 24 हजार खातेदारांना, 24 हजार 101 कोटी कर्जमाफीची मान्यता देण्यात आली, त्यापैकी 18 हजार कोटी कर्जमाफी प्रत्यक्षात देण्यात आली असल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले. तसंच जे जे शेतकरी राहिले आहेत त्यांना कर्जमाफी लवकरच देऊ अशी सारवासारवही केली.
मात्र यावरुन विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला.