दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन आणि इंधनाच्या दरवाढीमुळे आर्थिक संकटाचा सामना एसटी महामंडळाला करावा लागत आहे. याचा परिणाम एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही होत आहे. पगार वेळेवर होत नसल्यानं आलेल्या नैराश्यातून धुळे जिल्ह्यातील साक्री इथं एका एसटी चालकानं आत्महत्या केली होती. त्यानंतर आता सरकारला जाग आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थकीत वेतनामुळं आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं अखेर दिलासा दिला आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर आवश्यक बाबींसाठी 500 कोटी रुपयांचा निधी तातडीनं देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर तातडीनं हा निधी महामंडळाला वितरीत करण्यात आला आहे.


चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून उर्वरीत 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.


कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे.