मुंबईत उद्यापासून लोकल पास देण्याची प्रक्रिया, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर सुविधा
रेल्वे मासिक पास देण्याची ऑफलाईन प्रक्रिया आठवड्यातील सर्व दिवशी सुरु राहणार असून बनावट कोविड प्रमाणपत्र आढळल्यास होणार कठोर पोलीस कार्यवाही
मुंबई : लसीचे दोन डोस घेतलेल्यांना 15 ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणं सोयीचं व्हावं, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झालेल्यांची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया उद्यापासून सुरु होत आहे.
ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 53 रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात 109 स्थानकांवर सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत सलग दोन सत्रांमध्ये सुरु होणार आहे. त्याआधारे नागरिकांना मासिक रेल्वे प्रवास पास रेल्वेकडून देण्यात येईल, अशी माहिती मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.
ज्या प्रवाशांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत, त्यांना मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी सातत्याने मागणी होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक निर्णय जाहीर केला. यासाठी ऑनलाईन अॅप तसंच ऑफलाईन अशा दोन्ही रितीने सुविधा पुरवली जाणार आहे. अॅप तयार करुन ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्याची कार्यवाही काही कालवाधीतच सुरु होईल अशी माहिती इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.
त्याआधी 11 ऑगस्टपासून ऑफलाईन प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे, जेणेकरुन सर्वसामान्य मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये असं चहल यांनी म्हटलं आहे. रेल्वे मासिक पास देण्याची ही ऑफलाईन प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत आणि आठवड्यातील सर्व दिवशी सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये, असं आवाहन इक्बालसिंह चहल यांनी केलं आहे.
अशी आहे लोकल पासची प्रक्रिया
- नागरिकांनी पडताळणीसाठी येताना कोविड लसीकरण दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व छायाचित्र ओळखपत्र पुरावा आणणे आवश्यक
- पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्यांना दिनांक 15 ऑगस्टपासून प्रवासाची मुभा
- मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 53 रेल्वे स्थानकांवर 358 मदत कक्ष उघडणार
- संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात एकूण 109 स्थानकांवर मदत कक्ष
- सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये कक्ष राहणार कार्यरत
- घरानजीकच्या स्थानकांवर पडताळणीसाठी जावे, मात्र विनाकारण गर्दी करु नये
- बनावट कोविड प्रमाणपत्र आढळल्यास होणार कठोर पोलीस कार्यवाही