मुंबईतील IFSC केंद्र गुजरातला नेण्याचा प्रकार दुर्दैवी - भुजबळ
IFSC केंद्र गुजरातला हलविण्यात येणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने घेतलेला निर्णयाविरोधात आता राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत.
मुंबई : शहरातील IFSC केंद्र गुजरातला हलविण्यात येणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने घेतलेला निर्णयाविरोधात आता राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. आता राष्ट्रादीचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही नाराजी व्यक्त करताना हा सगळा प्रकार १ मे या महाराष्ट्र दिन करणे हे दुदैवी आहे, अशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आता राज्य विरुद्ध केंद्र सरकार संघर्ष पेटण्यास सुरुवात झाली आहे.
देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईचे विशेष महत्व आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. राज्याचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रकार आहे. आजही मुंबई महाराष्ट्राला आणि देशाला पोसते. एवढा व्यवहार मुंबईतून होतो. त्यामुळे महाराष्ट्र दिनीच हा प्रकार करणे हे दुर्दैवाचं आहे, अशी टीका अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
आता भाजप शांत का? - काँग्रेस
त्याचवेळी काँग्रेसचे युवक नेते सत्यजित तांबे यांनी जोरदार टीका केली आहे. IFSC चे मुख्यालय गुजरात ला जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असताना IFSC मुंबईत BKC येथे असेल असे आश्वासन दिले होते. पण आता, भाजप शांत का, असा थेट सवाल उपस्थित केला आहे. मुंबईचे आर्थिक राजधानी म्हणून असलेले महत्व कमी करण्याच्या मोठ्या षडयंत्राचा हा भाग आहे, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
'कुठलेही शहर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होणार नाही'
दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी टीका केली आहे. केवळ नाव दिल्याने कुठलेही शहर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होत नसते. IFSC हे नाव घेतले म्हणून गांधीनगरला ते वित्तीय सामर्थ्य मिळणार नाही. जागतिक आर्थिक केंद्र मुंबईची ताकद राहीलच, ती शक्ती फक्त मुंबईतच आहे हे जग जाणते ,अशी टीका सुभाष देसाई यांनी कालच केली होती.
केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात ट्विटर करत सुभाष देसाई यांनी टीका केली आहे. देशाचा अव्वल मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार, रिझर्व्ह बॅंक, सेबी यांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था मुंबईतच आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईकर ही ताकद यापुढेही उत्तुंग शिखरावर नेतील, असे ते म्हणालेत.