पत्रकार जे. डे. हत्येप्रकरणी छोटा राजन दोषी, जिग्ना वोरा निर्दोष
पत्रकार जिग्ना वोरा हिला निर्दोष असल्याचं म्हटलं आहे.
मुंबई : मिडडेचे पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालात जे. डे. यांच्या हत्येचा आरोप असलेल्या ११ पैकी छोटा राजन याच्यासह ९ जण दोषी तर, पत्रकार जिग्ना वोरा हिला निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. डे यांच्या हत्त्येमुळे देशभरात खळबळ उडाली होती. सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी आणि दीपक सिसोडीया अशी दोषी ठरवण्यात आलेल्या नऊ जणांची नावे आहेत. महत्त्वाचे असे की, पॉल्सन जोसेफ यांच्यावर जे. डे. यांच्या हत्येसाठी सिमकार्ड पुरवल्याचा आरोप होता. मात्र, न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी छोटा राजन हा या खटल्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित नव्हता. पण, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तो न्यायालयात उपस्थित होता. छोटा राजन सध्या तिहार कारागृहात आहे.
दरम्यान, देशभरात पत्रकारांच्या हत्या होत असताना केलेल्या वार्तांकनासाठी अडरवर्ल्डकडून एखाद्या पत्रकाराची हत्या होणं ही बहूदा पहिलीच घटना होती. हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्थंभावर झालेला हल्ला आहे. त्यामुळे हे अतिशय दुर्मिळ प्रकरण आहे असे गृहित धरून आरोपींना जास्तित जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी फिर्यादी वकिलांनी न्यायालयात केली. जे डे यांची ११ जून २०११ रोजी हत्या करण्यात आली होती, जे डे हे इंग्रजी दैनिकांसाठी पत्रकारिता करत होते.
काय घडलं जे. डे. च्या हत्येदिवशी
जे डे हे अंडरवर्ल्डमधल्या घडामोडींचं वार्तांकन करायचे. ११ जून २०११ च्या दिवशी घाटकोपरमध्ये आईची भेट घेऊन जे डे पवईच्या आपल्या फ्लॅटवर जात असताना पवई हिरानंदानी परिसरात बाईकवरून आलेल्या मारेकऱ्यांनी जे डे यांच्यावर गोळीबार केला. ५ गोळ्या जे डे यांच्यावर झाडण्यात आल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सुरूवातीला तपास मुंबई पोलीस आणि मुंबई क्राईम ब्रँचतर्फे केला जात होता. मात्र छोटा राजनला अटक करून भारतात आणल्यावर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. या प्रकरणात एकूण १२ आरोपी आहेत. यातल्या विनोद असरानी उर्फ विनोद चेम्बूरचा मृत्यू झालाय. त्यामुळे ११ आरोपींविरोधात हा खटला सुरू आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार जे डे यांच्या वार्तांकनामुळे छोटा राजन नाराज होता. त्यामुळे राजनच्या सांगण्यावरून सतीश कालिया या गुंडाने जे डे यांच्यावर गोळ्या झाडल्या. यासाठी सतीश कालियाला पाच लाखांची सुपारी देण्यात आली होती. त्यातील २ लाख रूपये अॅडव्हान्स तर ३ लाख रूपये हत्येनंतर देण्यात येणार होते. या प्रकरणात एशियन एज या वृत्तपत्राच्या मुंबई डेप्युटी ब्युरो चीफ आणि महिला पत्रकार जिग्ना व्होरा यांना अटक झाल्यामुळे खळबळ माजली होती. हत्याकांडा आधी व्होरा आणि राजन यांच्या तब्बल ३० हून अधिक वेळा फोनवरून संभाषण झालं. घटनेच्या आधी ३ ते ४ महिन्यांपासून मारेकरी जे डे यांच्यावर लक्ष ठेऊन होते.
कशी घडली जे डे यांची हत्या?
हत्येच्या दिवशी सतीश कालिया आणि अरूण डाके यांनी बाईकवरून येऊन जे डेंवर गोळीबार केला. सतीश कालियाने गोळ्या झाडल्या तर अरूण डाके बाईक चालवत होता. दुसऱ्या बाईकवर मंगेश आगवणे आणि अनिल वाघमारे हे दोघे होते. तिसऱ्या बाईकवर अभिजीत शिंदे आणि निलेश शेडगे होते. सचिन गायकवाड आणि इतर आरोपी जीपमध्ये बसून जे डे यांचा पाठलाग करत होते. नैनितालला राहणाऱ्या दीपक सिसोदियाने या हत्याकांडासाठी सतीश कालियाला काडतुसं आणि पिस्तुल दिलं होतं. तर पॉल्सन जोसेफ नावाच्या आरोपीने सतीश कालियाला ग्लोबल रोमिंग कार्ड्स आणि सुपारीचं अॅडव्हान्स पेमेंट म्हणून 2 लाख रूपये दिले होते. या रोमिंग कार्डावरून जिग्ना व्होरा आणि छोटा राजन यांच्यात फोन संभाषण झालं होतं.
साक्षीदारांनी फिरवली साक्ष
या प्रकरणातल्या दोन साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली. त्यात एका पत्रकाराचाही समावेश आहे. तर पोलिसांना अजूनही दोन आरोपी अटक करता आलेले नाहीत. त्यापैकी रवी रितेश्वर या आरोपीला परदेशात अटक झालीय. मात्र त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आलेलं नाही तर नयनसिंह बिष्त हा आरोपी अजूनही फरार आहे.