मुंबई : मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयाचे तत्कालीन अधीक्षक यांनी पदाचा दुरुपयोग करून नियमबाह्य पद्धतीने यंत्रसामुग्री खरेदी केल्याची बाब शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी उघडकीस आणली. याला राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही दुजोरा दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे.जे. रुग्णालयात २०१७ ते १९ या काळात तत्कालीन अधीक्षक यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला. त्यांनी नियमबाह्यरीत्या १ कोटी ४१ लाखांची अनावश्यक यंत्रसामग्री वित्त विभागाची मान्यता न घेताच खरेदी केली. या खरेदीत गैरप्रकार झाल्याचा आरोप आमदार सुनील प्रभू यांनी केलाय. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. 


वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ही बाब खरी असल्याचे मान्य केलंय. तसेच, या प्रकरणी डॉ. भोसले यांची चौकशी समिती नेमण्यात आलीय. राज्यात कोरोनामुळे लोकडाऊन घोषित करण्यात आला. अपुरे मनुष्यबळ, शासकीय यंत्रणा या कोरोना काळात व्यस्त असल्यामुळे या चौकशी कमिटीचा अहवाल तयार झाला नाही, असं सांगितलं.


या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी राज्य शासनाने संचालनालय स्तरावर त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे. ही समितीही चौकशी करत असल्याची माहितीही मंत्री अमित देशमुख यांनी दिली.