मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई: जैन समाजाच्या चातुर्मास पर्वाला 18 जून पासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. त्यानुसार चातुर्मास पर्वासाठी जैन साधु-साध्वींना पायी प्रवास व स्थलांतर करता येईल. चातुर्मासाचा हा कार्यकाळ जैन श्रावक श्राविकांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. या काळात जैन साधू व साध्वी महाराष्ट्र व कर्नाटक मधील काही भागांमध्ये निश्चित केलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पायी जातात. या साधू आणि साध्वींसोबत मोजका सेवकवर्ग ही असतो. मात्र, कोरोनामुळे यंदा त्यांना पायी चालत जाण्यास परवानगी मिळणार की नाही, हा प्रश्न उपस्थित झाला होता.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमुळे त्यांच्या प्रवासात अडथळे येण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर जैन श्रावीकांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन साधूंना प्रवासाची परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती.

यानंतर  राज्यमंत्री यड्रावकर यांनी यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला होता. या चर्चेनंतर किशोरराजे निंबाळकर यांनी शासकीय नियमांचे पालन करत जैन साधू आणि साध्वींना प्रवास करण्याची परवानगी दिली. या निर्णयामुळे महाराष्ट्रामधील सर्व जैन साधू व साध्वींना त्यांनी निश्चित केलेल्या स्थळी जाऊन चातुर्मास पूर्ण करता येईल.