धावत्या ट्रेनमध्ये चौघांवर गोळीबार, विरार स्टेशन येताच साखळी खेचली अन्... जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये नक्की काय घडलं?
Jaipur Mumbai Train Firing : जयपुरहून मुंबईकडे येणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये ( गाडी क्र. 12956 ) सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. चेतन कुमार नावाच्या आरोपीने त्याच्या रायफलमधून 12 गोळ्या झाडत चार जणांची हत्या केली आहे.
Jaipur-Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई एक्स्प्रेस (Jaipur-Mumbai Express) गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सोमवारी सकाळी धावत्या एक्स्प्रेसमध्ये 4 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात चेतन सिंह (Chetan Sing) नावाच्या आरपीएफ (RPF) कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. चेतन सिंहने सहाय्यक पोलीस निरिक्षक टीकाराम मीना यांच्यासह तीन प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर साखळी खेचून ट्रेन थांबवली आणि पळ काढला. त्यानंतर भाईंदर रेल्वे पोलिसांनी आरोपी चेतन सिंहला अटक केली आहे. पहाटे साडेपाच वाजता धावत्या रेल्वेमध्ये गोळीबार करण्यात आला. जयपूर-मुंबई सुपरफास्ट ट्रेनमधील बोगी क्रमांक 5 मध्ये झालेल्या या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
रेल्वे पोलिसांकडून आरोपी चेतन सिंहची कसून चौकशी सुरु आहे. तपासामध्ये चेतन कुमारने सुमारे 12 राउंड फायर केल्याचे समोर आले आहे. त्याने AKM हे शस्त्र वापरले, जे AK-47 ची अद्ययावत आवृत्ती आहे. आरोपीने धावत्या ट्रेनमध्ये तीन ठिकाणी गोळीबार केला. चेतन कुमारने बी-5 कोचमधील दोन जणांना ठार केले. यासोबत पॅन्ट्रीमध्ये एका व्यक्तीलाआणि एस-6 मध्ये आणखी एका व्यक्तीला ठार केल्याची माहिती आहे.
आरोपी चेतन कुमार हा लोअर परळ स्टेशन आरपीएफ कार्यालयात आहे. मृत एएसआय टिकाराम हे दादर आरपीएफमध्ये तैनात होते. आरपीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेस ट्रेनमध्ये सुरक्षेसाठी एक वरिष्ठ अधिकारी आणि तीन ते चार पोलिस नेहमीच तैनात असतात. मृत टिकाराम हे जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये प्रभारी होते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे अधिकारी तैनात केले जातात.
रविवारी आरोपी चेतन सुरत रेल्वे स्थानकापर्यंत दुसऱ्या ट्रेनमध्ये कर्तव्यावर होता. सुरत रेल्वे स्थानकावर त्याने काही तास विश्रांती घेतली. त्यानंतर सोमवारी पहाटे 2.50 वाजता चेतन सुरत रेल्वे स्थानकावरून जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये चढला. चेतनसोबत आणखी दोन कॉन्स्टेबल आणि एएसआय टिकाराम होते. जयपूर मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसला एस्कॉर्ट करण्यासाठी एकूण तीन कॉन्स्टेबल आणि एक एएसआय तैनात करण्यात आले होते. सूरतवरुन वापीहून गाडीचा पुढचा थांबा बोरिवली होता. ट्रेन पालघर रेल्वे स्थानकाजवळून जात असतानाच चेतनने गोळीबार सुरू केला आणि एकापाठोपाठ चार जणांची हत्या केली.
त्यानंतर चेतनने विरार स्थानकानंतर चेन खेचली आणि त्यानंतर मीरा रोड स्टेशनवर ट्रेन थांबली. त्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र रेल्वे स्थानकावर आधीच तैनात असलेल्या पोलिसांनी चेतनला पकडले. त्यानंतर गाडी पुढे बोरिवली रेल्वे स्थानकावर नेण्यात आली. चौघांचेही मृतदेह खाली उतरवल्यानंतर गाडी मुंबई सेन्ट्रल स्थानकाकडे रवाना करण्यात आली. मुंबई सेन्ट्रल येथे गाडी येताच बोगी सील करण्यात आली आहे.