आमच्या खुर्चीवर ज्यांना बसायचंय ते पवार-शहा भेटीच्या वावड्या उठवत आहेत- जयंत पाटील
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा झी २४ तासशी बोलताना आरोप
दीपक भातुसे, मुंबई : अमित शहा आणि शरद पवार यांच्या कथित भेटीबाबत राजकीय वर्तुळात अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. ही भेट झाली नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते करतायत, मात्र शरद पवारांनी याबाबत अद्याप खुलासा न केल्याने हा संभ्रम कायम आहे.
ज्या शक्तीला आमच्या खुर्चीवर बसायचे आहे त्या शक्ती महाविकास आघाडीतील तीन पक्षात मतभेद व्हावेत यासाठी पवार - शहा भेटीच्या वावड्या उठवत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत झी २४ तासशी बोलताना केला आहे.
जयंत पाटील यांनी म्हटलं की, शरद पवार आणि अमित शाह यांची अहमदाबाद इथे भेट झाली नाही. भेट झाल्याच्या सतत वावड्या उठवत आहेत. पवार मुंबईला आले, आजारी पडले, त्यानंतर रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे त्यांनी खंडन करण्याची गरज नाही. आमच्या इतर नेत्यांनी त्याचे खंडन केले आहे.
'राष्ट्रवादीबद्दल शंका निर्माण करण्याचं काम केलं जातं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष महाविकास आघाडीत एकत्र काम करत आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नसताना, यांचं पटू नये असा प्रयत्न बाहेरून काही शक्ती करत आहेत. ज्यांना आमच्या खुर्चीवर बसायचं आहे त्या शक्ती हा प्रयत्न करत आहेत.' असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
'संभ्रम तयार करणे आणि मतभेद होतायत का बघणे हा प्रयत्न आहे. सतत दीड वर्ष आमच्या तीन पक्षात वितुष्ट यावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. व्याजाचे दर कमी करताय आणि मग तुमच्या लक्षात येतं निवडणुकीत फटका बसेल. देशाच्या अर्थव्यवस्थेशी तुम्ही खेळताय. व्याजदर कमी केल्याने सरकार विरोधात नाराजी होईल आणि मतं मिळणार नाहीत, हे लक्षात आल्याने निर्णय फिरवला गेला. हा बालिशपणा आहे.' अशी टीका देखील जयंत पाटील यांनी केली आहे.